लोकमत न्युज नेटवर्क, मुंबई: अवकाळी पावसामुळे मुंबईत सोमवारी विविध भागांत झालेल्या दोन दुर्घटनांत एकूण ७८ जण जखमी झाले. त्यात घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. ७८ जखमींपैकी ३१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ४७ जण उपचार घेत आहेत. घाटकोपरच्या दुर्घटनेतील जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नातेवाइकांनी राजवाडी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सर्व जखमींवर प्रथम उपचार दिले जात आहेत. अनेक रुग्णांवर रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय चाचण्या सुरू होत्या. ३१ जणांना सोडून देण्यात आले. राजावाडी रुग्णालयातील वाढता ताण लक्षात घेता महापालिकेने सायन आणि केईएम रुग्णालय प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, तसेच ज्या रुग्णांना सायन रुग्णालयात हलविणे शक्य नाही त्यांना राजावाडी रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यांच्या शरीरावर विविध प्रकारच्या जखमा आहेत. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. राजावाडी रुग्णालयात ६२ रुग्ण असून, त्यापैकी एकाच्या बरगड्यांना दुखापत असल्यामुळे अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. - डॉ. भारती राजुलवाला, अधीक्षक, राजावाडी रुग्णालय.
जोगेश्वरी रुग्णालयातही उपचार सुरू
घाटकोपर येथील दुर्घटनेतील तीन रुग्णांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तीन उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. वडाळा येथील कार पार्किंग टॉवर कोसळण्याच्या दुर्घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन रुग्णांना उपचारासाठी सायन रुग्णालयात, तर एका रुग्णाला परळ येथील ग्लोबल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.