अजूनही ४७ लाख प्रवाशांना लोकल प्रवासाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:17+5:302021-02-07T04:07:17+5:30
लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : दहा महिन्यांनंतर मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. कोरोनापूर्वी ८० लाख जण ...
लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : दहा महिन्यांनंतर मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. कोरोनापूर्वी ८० लाख जण रेल्वे प्रवास करत होते. मात्र, पहिल्या आठवड्याअखेर रोज सरासरी ३३ लाख प्रवासी लोकल फेऱ्यांतून प्रवास करत असूनही ४७ लाख प्रवाशांना लोकल प्रवासाची प्रतीक्षा आहे.
सर्वांसाठी लोकल १ फेब्रुवारीला सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गांवर ६०,४१५ पासची विक्री झाली. कार्यालयीन कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अर्थात शुक्रवारी केवळ २८,४४४ पास काढण्यात आले. सोमवार ते शुक्रवार या काळात एकूण २,१२,५०१ पासची विक्री झाली, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. पश्चिम रेल्वेवर १ ते ५ फेब्रुवारी या काळात १,६८,३४९ पासची विक्री आणि ४४,५३७ पासला मुदतवाढ देण्यात आली. याच काळात १६ लाखांहून अधिक तिकीट विक्री झाल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ९५ टक्के लोकल फेऱ्या धावत आहेत. प्रवासी संख्या वाढल्यावर पूर्ण लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार येतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने शहरातील सर्वच व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उपनगरातील अनेक प्रवासी शहरात कामासाठी येतात. मात्र रोजचा प्रवास करण्यासाठी स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी सर्वांसाठी सर्व वेळेत लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र कोरोना संसर्गाची भीती असल्याने सकाळी कामावर जाण्याची आणि कामावरून घरी येण्याची वेळ वगळता लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
कार्यालयीन वेळेत बदल करण्याची गरज
दरम्यान कार्यालयीन वेळेत आवश्यक बदल करण्याबाबत सरकारकडून खासगी कंपन्यांना, आस्थापनांना सांगण्यात आले होते. मात्र लोकल सुरू होऊन एक आठवडा उलटल्यानंतर ही अद्याप कोणत्याही कंपन्यांनी कार्यालयीन वेळेत बदल केल्याची माहिती समोर आलेली नाही.