रुबेला लसीकरणाने ओलांडला ४७ लाखांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 05:11 AM2018-12-02T05:11:35+5:302018-12-02T05:11:42+5:30
२७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाने शनिवारी सायंकाळी राज्यभरात ४७ लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबई : २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाने शनिवारी सायंकाळी राज्यभरात ४७ लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे गोवर-रुबेला लसीकरणाविषयी कोणतेही गैरसमज न बाळगता लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे.
देशात दरवर्षी गोवरमुळे जवळपास पन्नास हजार मुले मृत्युमुखी पडतात. तर रुबेलामुळे दरवर्षी ५० बालके अपंग व गतिमंद जन्माला येतात. केंद्र सरकारने २०२० पर्यंत गोवरचे निर्मूलन व रुबेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्यविषयक कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात वर्षभरात गोवर झालेली ३३ मुले आढळली आहेत. त्यामुळे वेळीच औषधोपचार, लसीकरण गरजेचे आहे. गोवरमुळे होणारे बालमृत्यू, अंधत्व, मेंदूज्वर, कानाचे संक्रमण, फुप्फुसाचे संक्रमण यांसारखे मोठे आजार होऊ शकतात. गोवर-रुबेलावर फारसा उपचारही नाही. परंतु गोवर-रुबेलाचे प्रमाण लसीकरणामुळे कमी करता येऊ शकते. म्हणून सर्वांनी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे डॉ. पाटील म्हणाले.
>...तरीही लसीकरण करणे आवश्यक
एक गोवर-रुबेला लस दोन आजारांवर मात करत असून राज्यात पुढील दीड महिना लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. याअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शाळा, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी मोफत लसीकरण उपलब्ध असून याआधी गोवर/ एमआर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक असल्याचे तसेच पुन्हा लसीकरणाने कोणतेही दुष्परिणाम होणार नसल्याचेही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.