मुंबई : बिबट्या गणना अहवाल २०१८नुसार बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांची संख्या सहाने वाढली आहे. आता या उद्यान परिसरात ४७ बिबटे असल्याचे निरीक्षण अभ्यासात स्पष्ट झाले आहे. निरीक्षण अभ्यासातून उद्यानात ४७ बिबटे कॅमेरा टॅपिंगमध्ये कैद झाले आहेत. यात १७ नर बिबटे, २७ मादी बिबटे आणि तीन बिबट्यांच्या लिंगाची ओळख झाली नाही. या ४७ बिबट्यांव्यतिरिक्त आठ पिल्लांचा वावरही कॅमेऱ्यात टिपला गेला आहे. २०१७च्या तुलनेत बिबट्यांची संख्या सहाने वाढली आहे.आरे दूध वसाहत, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, आयआयटी-पवई, घोडबंदर गाव आणि नागला ब्लॉक या परिसराचा समावेश आहे. सुमारे १४० चौ. किलोमीटरचा भाग समाविष्ट करण्यात आला होता. तसेच उद्यान दोन भागांमध्ये विभागण्यात आले होते. पहिल्या भागात २४ कॅमेरा ट्रॅप आणि दुसऱ्या भागात २६ कॅमेरा ट्रॅप असे एकूण ५० कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. २५ एप्रिल ते ८ जून २०१८पर्यंत बिबट्यांचा अभ्यास करण्यात आला.एल ५९ हा बिबट्या मे २०१७ साली मालाड आणि २०१८ साली कामण-भिवंडी रस्त्यावर कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आला होता. या बिबट्याने घोडबंदर रस्ता, वसईची खाडी, दिवा-कामण-वसई रेल्वे मार्ग ओलांडला होता आणि कामण-भिवंडी मार्गावर मृतावस्थेत आढळून आला. सहा वेगवेगळ्या बिबट्यांच्या घटना आहेत की ज्यामध्ये त्यांचा संचार उद्यानाच्या एका भागातून दुसºया भागात दिसून आला. एक मादा बिबट्या एल२८ पिल्लासोबत (सी५) मे २०१८ साली कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसला. १ जानेवारी २०१९ रोजी हीच मादा फिल्मसिटीमध्ये सापळ्यात अडकून मृतावस्थेत मिळाली. मे २०१८ रोजी सी५ पिल्लू दिसून आले होते, ते १ मार्च २०१९ रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये एका हरणाची शिकार करताना दिसून आले. यावरून सी५ हे पिल्लू स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहे, अशी माहिती वन्यजीव संशोधक निकित सुर्वे यांनी दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांचे मार्गदर्शन या निरीक्षण अभ्यासासाठी लाभले.पहिल्यांदा दिसले २२ बिबटे; दरवर्षी होते संख्येत वाढ२०१५ साली ३५ बिबटे, २०१७ साली ४१ बिबटे आणि २०१८ साली ४७ बिबट्यांची नोंद झाली आहे. दरवर्षी बिबट्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते. यंदाच्या निरीक्षणात २२ बिबटे पहिल्यांदाच दिसले.यात १९ तरुण बिबटे निदर्शनास आले जे याअगोदरच्या कॅमेरा ट्रॅपिंग अभ्यासात दिसून आलेले नाहीत. २०१७च्या नोंदीनुसार १६ बिबटे दिसून आले नाहीत. हे बिबटे नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू तसेच उद्यानाच्या बाहेर स्थलांतर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.इतरही प्राण्यांची नोंद४७ बिबट्यांमधील २५ बिबट्यांची छायाचित्रे २०१५ आणि २०१७च्या नोंदीशी जुळली आहेत. उर्वरित २२ बिबट्यांचे पहिल्यांदा छायाचित्र प्राप्त झाले आहे. कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये रान मांजर, बॉनेट मकॅक ºहीसस मकॅक, वानर, सांबर, भेकर, चितळ, कस्तुरी मांजर, कांडेचोर, ससे आणि मुंगुस हे प्राणीदेखील दिसून आले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४७ बिबट्यांचा वावर, गेल्यावर्षीचा गणना अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 3:06 AM