शाळेत जायची ४७ टक्के विद्यार्थ्यांना घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:05 AM2020-11-28T04:05:31+5:302020-11-28T04:05:31+5:30
सर्वेक्षणातील निष्कर्ष : २३ टक्के मुले ऑनलाइन शिक्षणात समाधानी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार राज्यात अनेक ...
सर्वेक्षणातील निष्कर्ष : २३ टक्के मुले ऑनलाइन शिक्षणात समाधानी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्यात आल्या असून अनेक जिल्ह्यांत ३१ डिसेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ऑफलाइन वर्ग म्हणजेच शाळेत जाण्यास ४७.४ टक्के विद्यार्थी उत्सुक आहेत, तर २३.२ टक्के विद्यार्थी मात्र ऑनलाइन शिक्षणातच समाधानी आहेत. शाळेत जाऊन शिक्षण घेण्याबाबत २९.४ टक्के विद्यार्थ्यांनी मत निश्चित नसल्याचे सांगितले.
कोरोना संसर्गाचा वाढता धोका व दुसरी लाट यांच्या भीतीने शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे का? शाळा सुरू कराव्यात का? याबाबत संस्थाचालक, शिक्षक, पालक संभ्रमात आहेत. यादरम्यान ‘ब्रेनली’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्म म्हणून कार्यरत संस्थेकडून १६०० हून अधिक विद्यार्थ्यांचे मत जाणून घेण्यात आले.
दरवर्षी बाल दिनानिमित्त देशभरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. परंतु देशभरात कोरोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे शाळा बंद असल्याने या वर्षी हा विशेष दिवस शाळेत साजरा करता आला नसल्याची खंत वाटत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. ५५.३ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले, त्यांच्या शाळांनी बाल दिनानिमित्ताने व्हर्च्युअल कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तर ४४.७ टक्के विद्यार्थ्यांनी असा कोणताही कार्यक्रम शाळेने आयोजित केला नसल्याचे सांगितले. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के विद्यार्थ्यांना बाल दिन साजरा करण्यामागचा उद्देश माहीत असल्याचेही यातून निदर्शनास आले.
अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य
नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार, वेगवान इंटरनेट प्रवेश आणि ऑनलाइन लर्निंग ॲपमुळे काही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात समाधानी असल्याचे मत ‘ब्रेनली’चे सीपीओ राजेश बिसानी यांनी व्यक्त केले. ऑनलाइन क्लासेसद्वारे निदान अभ्यासक्रम पूर्ण करता येणार असल्याने विद्यार्थी समाधानी असू शकतात.
- राजेश बिसानी,
सीपीओ, ब्रेनली