मुंबई : वीज बिलांच्या आतापर्यंत ९,८०,४९९ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील अवघ्या ४७ हजार तक्रारी प्रलंबित आहेत, तर उर्वरित ९,३३,३२४ तक्रारींचे महावितरणकडून निवारण करण्यात आले आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात ३,२०१ वेबिनार, ५,६७८ मेळावे घेण्यात आले होते, तर १५,५२४ मदत कक्ष सुरू करण्यात आले होते. त्यापैकी १,७४२ मदत कक्ष सुरू आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.लॉकडाऊनमुळे मार्चनंतर प्रथमच विजेचे प्रत्यक्ष रीडिंग जून महिन्यात घेण्यात आले. त्यामुळे जूनच्या वीज बिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील सुमारे ९० ते ९७ दिवस वीज वापरानुसार युनिट संख्या नोंदविण्यात आली. या युनिट संख्येला सुमारे तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीज बिलाची आकारणी करण्यात आली आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांना थकीत व चालू वीज बिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरू असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीज ग्राहकांना यात सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे.
३६ लाख ग्राहकांनी भरले नाही वीजबिलराज्यातील ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार वीज ग्राहकांनी गेल्या एप्रिल २०२० पासून जानेवारी २०२१ या सलग १० महिन्यांच्या कालावधीत एकाही महिन्याचे बिल भरलेले नाही. घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गातील ३६ लाख ५२ हजारांहून अधिक ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून बिलच भरलेले नाही.