मेट्रो ३ प्रकल्पात गिरगाव येथील ४७३ इमारती बाधित; पुनर्विकासात ३९ मजले रहिवासी सदनिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 04:20 AM2020-06-29T04:20:17+5:302020-06-29T04:20:32+5:30

पुनर्विकसित इमारत काळबादेवी व गिरगाव भूमिगत मेट्रो स्थानकाच्या संलग्न बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हा पुनर्विकासाचा आराखडा खूप महत्त्वाचा आहे.

473 buildings in Girgaum affected in Metro 3 project; 39 storey residential flats in redevelopment | मेट्रो ३ प्रकल्पात गिरगाव येथील ४७३ इमारती बाधित; पुनर्विकासात ३९ मजले रहिवासी सदनिका

मेट्रो ३ प्रकल्पात गिरगाव येथील ४७३ इमारती बाधित; पुनर्विकासात ३९ मजले रहिवासी सदनिका

Next

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे गिरगाव येथील प्रकल्पबाधितांसाठी इमारत बांधण्यात येत असून त्यासाठी मागविलेल्या पूर्व अर्हता निविदेला बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवासी, व्यावसायिक व कार्यालयांचे पुनर्वसन गिरगाव येथे बांधण्यात येणार असलेल्या या इमारतीमध्ये केले जाणार आहे. गिरगाव पुनर्विकास इमारतीमध्ये ४७३ रहिवासी सदनिका, १३७ व्यावसायिक आस्थापना व १९ व्यावसायिक कार्यालयांचा समावेश राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कॉर्पोरेशनद्वारे लवकरात लवकर पूर्व अर्हता प्रक्रिया पूर्ण करून केली जाणार आहे. या प्रक्रियेमार्फत निवडलेल्या कंपन्यांद्वारे निविदा मागविण्यात येतील. या ४८ मजली इमारतीचे तीन तळमजले सेवा तसेच पार्किंगसाठी राखीव असतील. ग्राउंड लेव्हल, एक ते सात मजले अंशत: व्यावसायिक गाळे व सेवा देण्यासाठी राखीव असतील. तर आठ ते नऊ मजले व्यावसायिक गाळे, सेवा तसेच सुविधांसाठी राखीव असतील. १० ते १८ मजल्यांवर व्यावसायिक गाळे तसेच सदनिका असतील व १९ ते ४८ मजल्यांवर रहिवासी सदनिका असतील. या इमारतीस कार पार्किंगची सुविधा तसेच बगीचा आदी सुविधा राहतील. एकूण ४८ मजल्यांपैकी ३९ मजले रहिवासी सदनिकांसाठी राखीव असतील, असे कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले.

सामूहिक विकासाला चालना मिळेल
पुनर्विकसित इमारत काळबादेवी व गिरगाव भूमिगत मेट्रो स्थानकाच्या संलग्न बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हा पुनर्विकासाचा आराखडा खूप महत्त्वाचा आहे. काळबादेवी व गिरगाव येथील बरेच भूखंड लहान आहेत. रस्ता रुंदीकरणामुळे व नवीन डीसीपीआरप्रमाणे तेथे विकास होणे अशक्य होते. मात्र या प्रकल्पाच्या यशामुळे या भागात अनेक सामूहिक विकासाला चालना मिळेल. - रणजीत सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

६ भूखंडांचा एकत्रित विकास
काळबादेवी गिरगाव पुनर्वसन आराखड्यांतर्गत ६ वेगवेगळ्या भूखंडांचा एकत्रितरीत्या विकास केला जाणार आहे. एकूण ६ भूखंडांपैकी के २, के ३, जी ३ हे भूखंड एकात्मिकरीत्या विकसित केले जातील. तर के १, जी १ व जी २ हे भूखंड मेट्रोसंबंधी कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. के ३ ही इमारत बांधण्यासाठी वास्कॉन या कंपनीची आधीच निवड झाली आहे. या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

कोणी केले अर्ज दाखल? : पूर्व अर्हता अर्ज दाखल केलेल्या कंपन्यांमध्ये जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया), टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड, एल अ‍ॅण्ड टी लिमिटेड, वास्कॉन इंजिनीअरिंग लिमिटेड, शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, मोंटोकारलो लिमिटेड, कॅपसाइट इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड, न्याती इंजिनीअर्स अ‍ॅण्ड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड व नाथानी पारेख कन्स्ट्रक्शन लिमिटेड आदींचा समावेश आहे.

Web Title: 473 buildings in Girgaum affected in Metro 3 project; 39 storey residential flats in redevelopment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो