अनिल परब यांच्यासह ४८ जण निर्दोष मुक्त; राणे यांच्या सेना त्यागानंतरची धुमश्चक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 10:30 AM2024-12-01T10:30:25+5:302024-12-01T10:30:58+5:30
विशेष न्यायालयाच्या न्या. आदिती कदम यांनी शनिवारी परब, नांदगावकर, सरवणकर यांच्यासह ४८ जणांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली.
मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर प्रभादेवी येथे झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी शिवसेना नेते अनिल परब, श्रद्धा जाधव, मनसेचे बाळा नांदगावकर, शिंदेसेनेचे सदा सरवणकर आणि अन्य राजकीय नेत्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
विशेष न्यायालयाच्या न्या. आदिती कदम यांनी शनिवारी परब, नांदगावकर, सरवणकर यांच्यासह ४८ जणांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली.
नारायण राणे यांनी मतभेदांमुळे शिवसेना सोडली आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीत जाहीर सभा घेतली होती. ही सभा उधळून लावण्यासाठी तिथे मोठ्या संख्येने शिवसैनिक नेत्यांसह उपस्थित होते.
पोलिसांना या सभेत लाठीचार्ज करावा लागला होता. त्यात अनेकजण गंभीर जखमी झाले होते. तेव्हा शिवसेनेत असलेले आणि सध्या शिंदेसेनेत असलेले सरवणकर, मनसे नेते नांदगावकर, उद्धवसेनेचे परब यांच्यासह ४८ नेत्यांवर दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकही स्वतंत्र साक्षीदार नाही
या प्रकरणाचा खटला २०२२ मध्ये सुरू झाला. सरकारी वकिलांनी चार साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
चारही साक्षीदार पोलिस होते आणि एकाही स्वतंत्र साक्षीदाराची साक्ष न नोंदवल्याची बाब बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.