भांडुप जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्रावर ४८ सीसीटीव्हीची नजर; मानवी हालचाली ही टिपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:12 PM2023-09-07T12:12:38+5:302023-09-07T12:12:56+5:30
केंद्राचा परिसराची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत
- सीमा महांगडे
मुंबई: मुंबईला होणार होणार सगळ्यात मोठा पाणीपुरवठा भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातून होत असल्यामुळे मुंबईतील सर्वात संवेदनशील ठिकाणांपैकी एक म्हणून ते ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरु असून याचाच एक भाग म्हणून भांडुप जल शुद्धीकरण प्रक्रिया केंद्रावर तब्बल ४८ सीएसटीव्हीचा वॉच पालिका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर असलेले हे सीसीटीव्ही मानवी हालचाली ही अगदी ३६० अंशाच्या कोणामध्ये टिपू शकणार आहेत. त्यामुळे त्यामुळे या परिसरावर चोवीस तास देखरेख ठेवणे सहज शक्य होणार असून सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी होणार असल्याने मुंबईकरांना ही मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईला सात धरणांतून दररोज सुमारे तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. भांडुप जल शुद्धीकरण केंद्रामध्ये तुलसी जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र, भांडुप नवीन जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र व जुने जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र अशी ३ केंद्रे आहेत. धरणांतून येणाऱ्या सुमारे दोन हजार ८१० दशलक्ष लिटर पाण्यावर भांडुप संकुलात शुद्धीकरण प्रक्रिया करून ते मुंबईतील विभागीय जलाशयांमध्ये पाठवले जाते आणि तिथून हे पाणी मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचते. त्यामुळे भांडुप संकुलाचे महत्त्व पालिकेच्या लेखी मोठे आहे. त्यामुळे भांडुप जलशुद्धीकरण केंद्र हा मुंबईच्या पाणी वितरण साखळीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याने पालिकेने भांडुप संकुल अधिकाधिक अद्ययावत करण्याचे निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल ४८ सीसीटीव्हीची नजर या प्रक्रिया केंद्रावर ठेवण्याचा निर्णय पलिक जल अभियंता विभागाकडून घेण्यात आल्याची माहिती जल अभियंता विभागाचे प्रमुख पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.
मानवी हालचाली ही टिपणार
भांडुप जलशुद्धीकरण केंद्राचा परिसर संवेदनशील असल्याने विस्तीर्ण क्षेत्र, मानवी सुरक्षेच्या मर्यादा लक्षात घेता हाय डेफिनेशन नाईट व्हिजन तसेच ३६० अंशाच्या कोनात फिरणारा पोझिशन सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला. जलाशयांचे प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, पाय-यांचे दरवाजे या ठिकाणी अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही मॉनिटरिंग सिस्टीम’ स्थापित करण्यात आली आहे. या सीसीटीव्हीच्या ५०० मीटर परिसरातील मानवी हालचाली आणि इतर अन्य घडामोडी यातून टिपत येणार आहेत. या कॅमेऱ्यातील डेटा ही ३ महिन्यांपर्यंत सुरक्षित सेव्ह करत येणार आहे. यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची माहिती याद्वारे घेता येईल तशी कार्यवाही करता येईल. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र सुरक्षित राहून नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यास मदत होईल, अशी माहिती भांडुप जलशुद्धीकरण केंद्राचे कार्यकारी अभियंता गणेश नाडकर्णी यांनी दिली.
भांडुप संकुल जल शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प
जुन्या प्लांटची क्षमता १,९१० एमएलडी- सीसीटीव्ही ची संख्या २६
२०१८ मध्ये कार्यान्वित प्लांटची क्षमता ९०० एमएलडी- सीसीटीव्ही ची संख्या२३
नवीन प्लांटची क्षमता ९०० एमएलडी- ८
एकूण क्षमता ३,७१० एमएलडी