मुंबई : रस्त्यावर सोडलेली बेवारस वाहने वाहतूककोंडीच नव्हे तर डासांच्या उत्पत्तीसही कारणीभूत ठरत आहेत. अशी सात हजार वाहने महापालिकेने गेल्या दोन वर्षांमध्ये उचलून सुमारे २० एकर जागा मोकळी केली आहे. ही कारवाई अधिक वेगाने करण्यासाठी पालिका प्रशासनाने दहा टोइंग वाहने तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ४८ तास एखादे वाहन रस्त्यावर उभे दिसल्यास ते तत्काळ उचलण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असताना अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला वाहने सोडलेली असतात. महापालिकेने जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१७ या दीड वर्षात सुमारे सात हजार वाहने उचलली. मात्र आतापर्यंत वाहने उचलण्यासाठी शहर, पूर्व, पश्चिम उपनगरासाठी प्रत्येकी केवळ एक टोइंग व्हॅन आहे. त्यामुळे या कारवाईला मर्यादा येत असल्याने सर्व सात परिमंडळांच्या स्तरावर ‘टोइंग व्हॅन’ व परिमंडळ दोन, चार आणि पाचमध्ये एक अतिरिक्त अशी दहा वाहने असणार आहेत.बेवारस वाहने उचलल्यानंतर संबंधित वाहन मालकाला दंड भरून वाहन सोडवून नेता येणार आहे. मात्र, ३० दिवसांच्या कालावधीदरम्यान वाहन सोडवून न नेल्यास त्या वाहनाचा महापालिकेद्वारे लिलाव केला जाणार आहे.परिसरात एखादे सोडून दिलेले वाहन आढळल्यास त्याविषयीची तक्रार महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे किंवा १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.वाहनांनी बळकावली २० एकर जागादोन वर्षांत पालिकेने सुमारे सात हजार बेवारस वाहने मुंबईच्या रस्त्यावरून उचलली. रस्त्यावर एक वाहन उभे करण्यासाठी १२४ चौरस फूट जागा लागते. म्हणजेच सात हजार वाहनांनी सुमारे आठ लाख ६८ चौरस फूट म्हणजेच २० एकर जागा बळकावली होती.१ जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१७ या काळात ६४१३ वाहने उचलण्यात आली. यापैकी २८२६ वाहनांचा लिलाव करण्यात आला. तर उर्वरित वाहने पालिकेच्या गोदामात ठेवण्यात आली आहेत. तर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात आणखी ६०५ बेवारस वाहने रस्त्यावर उभी असल्याचे आढळून आले.या वाहनांचा लिलाव २३ आॅगस्ट रोजी झाला. त्या वेळी पालिकेने २८२६ वाहनांचा लिलाव केला. यातून पालिकेला सव्वा कोटींचे उत्पन्न मिळाले.
येथे नोंदवा तक्रारमहापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे किंवा १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा महापालिकेच्याwww.mcgm.gov.in अथवा portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना तक्रार नोंदविता येणार आहे.