Join us

मुंबईत दिवसभरात ४८ खासगी लसीकरण केंद्र ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:08 AM

७३ खासगी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर; लसीकरणात अडथळा कायमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत सलग सहाव्या दिवशी लसींचा ...

७३ खासगी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर; लसीकरणात अडथळा कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत सलग सहाव्या दिवशी लसींचा तुटवडा कायम असून यामुळे दिवसभरात ४८ खासगी लसीकरण केंद्र ठप्प झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. सध्या लसींच्या तुटवड्यामुळे अनेक केंद्रांवर लसीकरण बंद होत आहे. मंगळवारी रात्री १ लाख १० हजारांचा लसींचा साठा आला असला तरी २ ते ३ दिवस पुरेल इतकाच साठा आहे. लस तुटवडा असल्याने पालिका फक्त पालिका केंद्रांनाच लस पुरवठा करणार असल्याने ७३ खासगी लसीकरण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

लस टोचून घेण्यास उत्सुक मुंबईकर मात्र लस मिळत नसल्याने संताप व्यक्त करत आहेत. मागील शुक्रवारपासून लस तुटवड्यास सुरुवात झाली. यात रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असून त्या दिवशी लसीकरण केले जात नाही. सोमवारपर्यंत ३२ खासगी लसीकरण केंद्रे बंद होती. मंगळवारी १ लाख १० हजार इतक्या तुटपुंज्या लसींचा साठा केंद्राकडून पाठविण्यात आला. मात्र या साठ्यामुळे केवळ २ ते ३ दिवस ते ही केवळ पालिका लसीकरण केंद्रात पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती पालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. केंद्राकडून योग्य प्रमाणात लसींच्या डोसची उपलब्धता न झाल्यास येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात खासगी लसीकरण केंद्रे बंद होण्याची शक्यता आहे.

...........................