मुंबईकरांची ५०% पाणी चिंता मिटली; तलावांमध्ये जमा झाला ४९ टक्के जलसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:54 AM2020-08-09T01:54:54+5:302020-08-09T01:56:06+5:30
अप्पर वैतरणा तलाव वगळता अन्य सर्व तलाव आता निम्मे भरले
मुंबई : पावसाळी ढग अखेर तलाव क्षेत्रात परतले आहेत. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. एकूण ४८.९३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. अप्पर वैतरणा तलाव वगळता अन्य सर्व तलाव आता निम्मे भरले आहेत.
या आठवड्यापासून मुंबईच्या तलाव क्षेत्रातही पावसाने चांगला जोर धरला आहे. मुंबईत पावसाने धारेवर धरले असले तरी तलाव क्षेत्रात दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तलावांच्या पातळीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. मात्र हे दोन तलाव सर्वात लहान असल्याने तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा या तलावांमधील पाणीसाठा वाढणे आवश्यक आहे.
मुंबईत दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. गेल्या २४ तासांमध्ये क्षेत्रात एकूण ३७ हजार ३५१ दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. त्यामुळे आता तलावांमध्ये एकूण सहा महिने पाणीपुरवठा होईल एवढा जलसाठा जमा झाला आहे. मुंबईत ५ आॅगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपयुक्त साठा सध्या
(दशलक्ष)
मोडक सागर १६३.१५ १४३.२६ ७५५०१ १५६.३६
तानसा १२८.६३ ११८.८७ ६६७०६ १२४.०९
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.४०
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२६
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ६६५८६ ५९८.१६
भातसा १४२.०७ १०४.९० ३६५६९८ १२७.४८
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० ९७९१८ २६७.४३