महाड-तळीये गावात दरड काेसळून ४९ जणांचा मृत्यू, पाेलादपूरमध्ये ११ जणांना मृत्यूने कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:08+5:302021-07-24T04:06:08+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी काेसळलेल्या दरडीखाली दबून ४९ जणांचा मृत्यू झाला, तर ...

49 killed in Mahad-Taliye village, 11 killed in Peladpur | महाड-तळीये गावात दरड काेसळून ४९ जणांचा मृत्यू, पाेलादपूरमध्ये ११ जणांना मृत्यूने कवटाळले

महाड-तळीये गावात दरड काेसळून ४९ जणांचा मृत्यू, पाेलादपूरमध्ये ११ जणांना मृत्यूने कवटाळले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी काेसळलेल्या दरडीखाली दबून ४९ जणांचा मृत्यू झाला, तर पाेलादपूर येथे दरडीखाली ११ असा एकूण ६० जणांचा बळी गेला. शुक्रवारी बचावकार्य सायंकाळी सहा वाजता थांबवण्यात आले आहे. बचाव पथक, पाेलीस यंत्रणा आणि डाॅक्टर यांनी बचावकार्य संपल्याचे सांगितले आहे. ढिगाऱ्याखाली काेणी अडकले आहे का, याची खात्री पुन्हा एकदा करण्यासाठी शनिवारी बचावकार्य हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.

गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीने आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा महाड तालुक्याला बसला आहे. गुरुवारी महाड आणि पाेलादपूर तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील तळीये या गावात गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरड काेसळली हाेती. याची माहिती प्रशासनास सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मिळाली. त्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले; परंतु पावसाचा जाेर, पुराचे पाणी, मार्गात दरडी पडल्याने घटनास्थळी पाेहोचण्यात अडचणी येत हाेत्या. पाचाडमार्गेही दरड काेसळली हाेती. त्यामुळे अडथळा निर्माण झाला हाेता. रात्री हेलिकाॅप्टरच्या साहाय्याने घटनास्थळी बचाव पथकाला उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अतिवृष्टीमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता मदत आणि बचावकार्याला सुरुवात झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४९ मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी सहा वाजता बचावकार्य थांबवण्यात आले. अद्यापही माेठ्या संख्येने नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पाेलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड काेसळली. त्यात सहाजणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच, असा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दाेन्ही गावांतील १३ जखमींना महाड, पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

Web Title: 49 killed in Mahad-Taliye village, 11 killed in Peladpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.