Join us

बीकेसीसह मुंबईतील ४९ लसीकरण केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:07 AM

साठा संपला; लस न घेताच अनेकांना फिरावे लागले माघारीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील वांद्रे - कुर्ला (बीकेसी) ...

साठा संपला; लस न घेताच अनेकांना फिरावे लागले माघारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील वांद्रे - कुर्ला (बीकेसी) येथील सर्वात मोठ्या काेरोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी लस संपल्याचे फलक झळकले. लसींचे डोस संपल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले. मुंबईत दुसऱ्यांदा लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. मंगळवारी पालिकेची आणि खासगी मिळून एकूण ४९ लसीकरण केंद्र ठप्प झाल्याची माहिती पालिकेने दिली.

मुंबईत लस टंचाईचा सलग तिसरा दिवस असून, १ मेपासून सुरू होणाऱ्या नव्या टप्प्यातील लसीकरण कसे करणार, असे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

बीकेसी केंद्रावर मंगळवार सकाळपासून कोविशिल्डचे ३५० ते ४०० डोस नोंदणी करून येणाऱ्या नागरिकांना देण्यात आले. मात्र, त्यानंतर येथे लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे आता पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पाहावी लागेल, असे वांद्रे कुर्ला जम्बो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र डेरे यांनी सांगितले. दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस उपलब्ध असून, ते दिवसभरात दिले गेल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईत गेल्या आठवड्यापर्यंत ४० ते ५० हजार लोकांचे लसीकरण एका दिवसात होत होते. मात्र, सोमवारी ३५,३०९ लोकांचेच लसीकरण होऊ शकले, तर मंगळवारी २६ हजार ५४५ लोकांचे लसीकरण करण्यात आले. खासगी केंद्रांवर सोमवारी जेमतेम ५८५८ लोकांचे लसीकरण होऊ शकले, तर मंगळवारी अवघ्या ७४९३ लोकांचे लसीकरण करण्यात आले.

* ...तर आज पुन्हा लसीकरण हाेणार सुरू

मुंबईत दररोज ३० ते ५० हजार लसीकरण केले जात आहे. यामुळे लसीचा साठा कमी पडत आहे. लसींचा पुरवठा कमी असल्याने ४९ लसीकरण केंद्र बंद पडल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत लसींचा नवा साठा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ताे उपलब्ध झाल्यास बुधवारी सकाळी पुन्हा लसीकरण केंद्र टप्प्याटप्प्याने कार्यान्वित कऱण्यात येतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नमूद केले.

* लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणार

सध्या मुंबईत पालिकेची ४० व खासगी ७० तसेच राज्य व केंद्र सरकारची रुग्णालये, अशी एकूण १२० केंद्रे आहेत. पालिकेची ४० केंद्र वाढवून १०० पर्यंत ही संख्या वाढवली जाणार आहे. खासगी आस्थापना ज्यात जास्त संख्येने कामगार आहेत, अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहेत.

--------------------------