रेल्वेच्या मालमत्तांवर ४९१ चोरांचा डल्ला
By admin | Published: June 22, 2016 04:09 AM2016-06-22T04:09:09+5:302016-06-22T04:09:09+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम स्थानकाजवळील विद्युत उप केंद्रातून चोरांनी १८ बॅटरी चोरील्या गेल्याची घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण लोकल सेवा कोलमडली.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम स्थानकाजवळील विद्युत उप केंद्रातून चोरांनी १८ बॅटरी चोरील्या गेल्याची घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण लोकल सेवा कोलमडली. यामुळे रेल्वे मालत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. रेल्वेच्या मालत्तांवर चोरांकडून ‘डल्ला’ मारण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. उपनगरीय रेल्वे मार्गांवर रेल्वे मालमत्तांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. २0१५ पासून रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर १८ लाख किंमतीच्या मालमत्तांवर ४९१ चोरांनी डल्ला मारला आहे.
माहिम येथील वीज उपकेंद्रातून दोन महिन्यापूर्वीही ५७ बॅटरींची चोरी करण्यात आली होती. त्यानंतर या वीज उपक्रेंदाला सुरक्षा न पुरवण्याचा बेजबाबदारपणा पश्चिम रेल्वेने दाखवला आणि पुन्हा एकदा चोरी झाल्याचे समोर आले. रेल्वे मालमत्तांवर चोरांकडून गेल्या काही वर्षात चांगलाच डल्ला मारण्यात आला आहे. २0१५ पासून मध्य रेल्वेवर ११ लाख ८0 हजार ३४ रुपये किंमतीच्या मालमत्तेची चोरी झाली असून जवळपास ३१८ चोरांना अटक करण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. जवळपास ११ लाख ४५ हजार ४७२ रुपये मालमत्ता परत मिळविली आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवरीलही रेल्वे मालमत्तांवर चोरांनी चांगलाच डल्ला मारला आहे. ८ लाख १७ हजार ६५0 किंमतीच्या मालमत्ता चोरीला गेल्या असून ६ लाख ७९ हजार १५0 रुपये किंमतीची मालमत्ता परत मिळविण्यात यश आले. सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवासी आणि मालमत्तांच्या सुरक्षेसाठी अवघे ९५९ आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) आहेत. या सर्वांना तीन पाळ्यात काम करावे लागते. अपुरे मनुष्यबळ असल्याने ४00 होमगार्ड मदतीला देण्यात यावेत, अशी मागणी आरपीएफकडून पश्चिम रेल्वेकडे करण्यात आली आहे. तीच परिस्थीती मध्य रेल्वे आरपीएफचीही असून उपनगरीय मार्गांवर जवळपास २ हजार ४00 आरपीएफ प्रवासी आणि मालमत्ता सुरक्षेसाठी तैनात असतात. (प्रतिनिधी)