Join us

१७ बॅंकांना ४९५७ कोटींना फसवले; प्रतिभा इंडस्ट्रीजच्या कुलकर्णीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 6:52 AM

या प्रकरणी मुंबई, ठाणे येथे कंपनीशी निगडित चार ठिकाणी सीबीआयने छापेमारीत संशयास्पद कागदपत्रे जप्त केली.

मुंबई : दिल्ली मेट्रोसह मुंबई महापालिकेचे काही महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प हाताळणाऱ्या प्रतिभा इंडस्ट्रीजने बँक ऑफ बडोदा प्रणीत १७ बँकांची तब्बल ४९५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी सीबीआयने कंपनी व कंपनीच्या चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणी मुंबई, ठाणे येथे कंपनीशी निगडित चार ठिकाणी सीबीआयने छापेमारीत संशयास्पद कागदपत्रे जप्त केली.

दाखल एफआयआरनुसार, प्रतिभा इंडस्ट्रीजचे मालक अजित भगवान कुलकर्णी, रवी अजित कुलकर्णी, सुनंदा दत्ता कुलकर्णी, शरद प्रभाकर देशपांडे यांनी विविध पायाभूत प्रकल्पांसाठी बँक ऑफ बडोदा प्रणीत १७ बँकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जासाठी देण्यात आलेली रक्कम कंपनीशी संबंधित काही उद्योगांमध्ये तसेच कंपनीच्या उपकंपन्यांमध्ये वळवली. तसेच वळविलेली रक्कम कंपनीने निर्लेखित केली होती. याखेरीज उद्योगाचा महसूल फुगवून दाखवण्यासाठी कागदोपत्री अनेक बनावट व्यवहार केले. तसेच कंपनीतर्फे ज्या प्रकल्पांचे काम सुरू होते, त्याचा खर्च वाढल्याचे कारण पुढे करत बँकांकडून आणखी कर्जाची उचल केली. 

खात्याची नोंद ‘घोटाळेबाज’

  • कंपनीचे कर्ज खाते ३१ डिसेंबर २०१७ रोजी थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले होते. 
  • कंपनीला कर्ज देणाऱ्या १७ बँकांनी कंपनीच्या खात्याची नोंद ‘घोटाळेबाज’ अशी केली आहे. 
  • या प्रकरणी बँकांनी राष्ट्रीय कंपनी विधि प्राधीकरण (एनसीएलटी) मध्येही २०१९ मध्ये दावा दाखल केला होता आणि या प्रकरणी एनसीएलटीने २०२१ मध्ये कंपनीवर लिक्विडेटरची नेमणूक केली होती.
टॅग्स :धोकेबाजीबँकगुन्हा अन्वेषण विभाग