- श्रीकांत जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्यवरांच्या हस्ते उदघाटन सोहळा, विचारवंताचा जाहीर परिसंवाद, बोधीची भूमिका, काव्यकार कवी संमेलन, नाट्य सादरीकरण आणि कथावाचन असा भरगज्ज कार्यक्रमांनी '४ थी बोधी कला संगिती' चे आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा बोधी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी येथे केली. येत्या २० ते २२ फेब्रुवारी अशा तीन दिवशी दादर येथील शिवाजी मंदिरात ही संगिती होणार आहे.
बोधी नाट्य परिषद तसेच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थी बोधी कला संगितीचे येत्या २०, २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी दादर येथील शिवाजी मंदिरात संध्याकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे बोधी संगितीचे उद्घाटक असून साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे प्रमुख पाहुणे आहेत. यावेळी बोधीचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी भूमिका मांडणार आहेत.
दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध कवी डॉ. महेश केळुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली 'काव्यकार संमेलन' आहे. अभिनेते,कवी किशोर कदम, प्रा. प्रशांत मोरे, कविता मोरवणकर, डॉ. प्रज्ञा पवार, भगवान हिरे हे सहभाग होणार आहेत. बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी 'बोधी अर्थात ज्ञानदर्शी वाड्मय आणि आजचे वर्तमान' यावर प्रा. डॉ. रमेश वरखेडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आहे. त्यात देवेंद्र उबाळे, अरुण कदम, डॉ. वंदना महाजन सहभाग होणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात डॉ. सदानंद मोरे लिखित ' गोहर गंधर्व' हे नाटक बोधी नाट्य परिषद सादर करणार आहे.
गुरुवारी २२ फेब्रुवारीला डॉ. आंबेडकरांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ रूपी' ग्रंथांवर अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आहे. त्यात दीपक करंजीकर, स्वाती वैध, प्रा. अविनाश कोल्हे याचा सहभाग आहे. शेवटी अण्णाभाऊ लिखित ' बुद्धीची शपथ ' या कथेचे संबोधी बाळदकर कथावाचन आणि विलास सारंग याच्या एक विक्षिप्त जातककथचे वाचन होणार आहे.