Join us

५ आयपीएसच्या बदल्यांना स्थगिती; महाआघाडीतील मतभेद उघड; एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 1:26 PM

 काल झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या ५ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बढती दिली गेली होती; मात्र या बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असा आदेश गुरुवारी सकाळीच काढण्यात आला.

मुंबई : राज्यातील ३९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी रात्री झाल्या खऱ्या मात्र त्यानंतर बारा-चौदा तासातच त्यापैकी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची नाराजी समोर आली.

 काल झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या ५ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बढती दिली गेली होती; मात्र या बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असा आदेश गुरुवारी सकाळीच काढण्यात आला.

बदल्यांचा हा निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याकडे  केली होती. त्यानुसार पाच बदल्यांना स्थगिती देण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बदल्यांना स्थगिती केलेले पाचही अधिकारी ठाणे जिल्ह्याशी संबंधित आहेत.

गृहविभाग हा राष्ट्रवादीच्या अखत्यारित आहे; मात्र आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या सहीने होत असतात. त्यामुळे स्वपक्षीय एकनाथ शिंदे यांच्या होम डीस्ट्रीक्टमधील बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा न करता संमती  दिली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र माने यांची अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर येथे बदली झाली होती.  मीराभाईंदर वसई विरार पोलीस उपायुक्ता महेश पाटील यांची बृहन्मुंबई विभागाचे अपर पोलीस आयुक्त वाहतूक विभागात बदली झाली होती.  महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची अपर पोलीस आयुक्त ठाणे शहर प्रशासनात बदली झाली होती.  ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांची बृहन्मुंबई सशस्त्र पोलीसचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बृहन्मुंबई संरक्षण व सुरक्षाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती.  

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होण्याच्या अवघ्या बारा तासात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. ही प्रशासकीय चूक आहे का, याचा खुलासा झाला पाहिजे. याआधी दहा आयपीएस (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्याही बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या बदली घोटाळ्याची चौकशी सुरू असताना दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असल्याने याचा खुलासा झाला पाहिजे.- देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे