विमानतळाच्या मुख्य धावपट्टीचे ६०% काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:45 AM2020-01-08T05:45:26+5:302020-01-08T05:45:33+5:30
मुंबई विमानतळाच्या ०९-२७ या मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला
मुंबई : मुंबई विमानतळाच्या ०९-२७ या मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला असून सुमारे ६० टक्के काम पूर्ण होत आले आहे. या कामासाठी दररोज सुमारे साडेचारशे जण धावपट्टीवर तैनात असून पूर्ण प्रक्रियेमध्ये सुमारे आठशेपेक्षा जास्त माणसे गुंतलेली आहेत.
विमानतळाच्या ०९-२७ या मुख्य धावपट्टीद्वारे दर तासाला ४६ विमानांचे व्यवस्थापन तर १४-३२ या पर्यायी धावपट्टीद्वारे दर तासाला ३६ विमानांचे व्यवस्थापन करण्याची विमानतळाची क्षमता आहे. सध्या सुरू असलेल्या दुरुस्ती कामात (रिकार्पेटिंग) धावपट्टीच्या खराब होत आलेल्या थराला पूर्णत: काढण्यात येते व त्यानंतर पूर्णत: नवीन थर टाकण्यात येत आहे.
विमानतळावर ०९-२७ व १४-३२ अशा एकमेकांंना छेदणाऱ्या धावपट्ट्या आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांच्या मधील भागाच्या रिकार्पेटिंगचे काम मार्च २०१९ मध्ये करण्यात आले होते. सध्या दुसºया टप्प्यात ९-२७ या मुख्य धावपट्टीचे रिकार्पेटिंग सुरू आहे. तर नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत तिसºया टप्प्यात १४-३२ या पर्यायी धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम केले जाणार आहे.
दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद असली तरी केवळ धावपट्टी दुरुस्ती एवढेच काम नव्हे, तर त्याशिवाय इतर आनुषांगिक कामे करण्यात येत आहेत.