साडेपाच वर्षांत १३८ पोलिसांनी केला आयुष्याचा अंत!; कामाचा ताण, कौटुंबिक कलह कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 05:18 AM2019-08-19T05:18:00+5:302019-08-19T05:18:09+5:30

साडेपाच वर्षांत महाराष्टÑ पोलीस दलातील तब्बल १३८ पोलिसांनी आपल्या आयुष्याचा अंत करून घेतला आहे.

In 5 and a half years, 3 policemen end their lives! Causes work stress, family conflicts | साडेपाच वर्षांत १३८ पोलिसांनी केला आयुष्याचा अंत!; कामाचा ताण, कौटुंबिक कलह कारणीभूत

साडेपाच वर्षांत १३८ पोलिसांनी केला आयुष्याचा अंत!; कामाचा ताण, कौटुंबिक कलह कारणीभूत

Next

- जमीर काझी

मुंबई : सदैव कामाच्या ताणतणावाखाली वावरत असलेल्या पोलिसांचे प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही राज्यकर्ते व अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार केला जाते, पण प्रत्यक्षात त्यांच्यावरील ताण आणखी असल्याचे पोलिसांच्या वाढत्या आत्महत्यांतून स्पष्ट होत आहे. गेल्या साडेपाच वर्षांत महाराष्टÑ पोलीस दलातील तब्बल १३८ पोलिसांनी आपल्या आयुष्याचा अंत करून घेतला आहे. काहींचा अपवाद वगळल्यास बहुतांश जण हे कॉन्स्टेबल ते सहायक फौजदार या वर्गातीलच आहेत. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्योंत ९ जणांनी आत्महत्या केली आहे. साडेपाच वर्षांपैकी केवळ गेल्या अडीच वर्षातील आत्महत्यांबाबतचा सविस्तर तपशील उपलब्ध असल्याची कबुली पोलीस राज्य मुख्यालयाने दिली आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रस्तुत प्रतिनिधीने मिळविलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली आहे. कामाचा, बंदोबस्ताचा वाढता ताण, वेळी-अवेळची ड्युटी, आजार आणि कौटुंबिक कलह, वरिष्ठांची अरेरावी ही त्यांच्या आत्महत्याची प्रमुख कारणे आहेत. १ जानेवारी, २०१४ पासून पोलीस दलातील आत्महत्या, पद व वर्षनिहाय त्यांची संख्या आणि कारणे याबाबतची सविस्तर माहिती प्रस्तुत प्रतिनिधीने मागितली होती. मात्र, मुख्यालयाकडे २०१४ ते १६ या वर्षातील पोलिसांच्या आत्महत्यांची केवळ वर्षनिहाय संख्याच उपलब्ध आहे. त्यानंतर, म्हणजे १ जानेवारी, २०१७ पासून ३० जूनपर्यंत आत्महत्यांचा तपशील आहे. त्यानुसार, २०१४ मध्ये ३६ जणांनी आयुष्य संपविले होते, तर २०१५ व २०१६ या वर्षात अनुक्रमे २५ व १६ जणांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती मुख्यालयाने ‘क्राइम इन इंडिया’च्या आधारे दिली आहे. त्याशिवाय, २०१७ मध्ये २२ तर २०१८ या वर्षात २९ पोलिसांनी आपले आयुष्य संपविले. त्यामध्ये अप्पर महासंचालक, उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक व निरीक्षक दर्जाचे प्रत्येकी एक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक २५ आत्महत्या शिपाई यांनी केली आहेत, तर अनुक्रमे नाईक व हवालदार दर्जाच्या पोलिसांनी अनुक्रमे ११ व १४ आत्महत्या केल्या आहेत.

एसीपीच्या त्रासाने महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या
बहुतांश पोलिसांच्या आत्महत्यांची कारणे कौटुंबिक व वैयक्तिक असल्याचे पोलिसांच्या दप्तरी नमूद आहे. अडीच वर्षात पाच महिला पोलिसांपैकी केवळ एका प्रकरणात आत्महत्येसाठी वरिष्ठ अधिकºयाला जबाबदार धरले आहे. ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुभद्रा पवार या कॉन्स्टेबलने तत्कालीन भिवंडी वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त शामकुमार निपुंगे यांच्या छळाला कंटाळून ६ सप्टेंबर, २०१७ मध्ये गळफास लावून घेतला होता. आत्महत्येपूर्वीच्या दीड महिन्यांत त्यांनी तिच्या मोबाइलवर रात्री व पहाटेच्या वेळी तब्बल १०८ कॉल्स केल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते. या प्रकरणात निपुंगे सध्या निलंबित आहेत.

- महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) माजी प्रमुख व अप्पर महासंचालक हिमांशू रॉय यांनी २०१८ मध्ये रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. कर्करोगाला कंटाळून त्यांनी
हे कृत्य केले होते.
त्याचप्रमाणे, ५ वर्षांपूर्वी एका अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाºयाने पत्नीशी झालेल्या वादातून ऐन गणेशोत्सवात पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, त्या अधिकाºयाच्या कुटुंबीयांना सेवाशर्तीतील लाभ व्हावा, यासाठी अपघाताने हा प्रकार घडल्याचे नमूद करीत हे प्रकरण बंद केले होते.


अडीच वर्षांतील पोलिसांच्या
पदनिहाय आत्महत्या
पद संख्या
शिपाई (कॉन्स्टेबल) २५
नाईक ११
हवालदार १४
सहायक फौजदार ६
उपनिरीक्षक १
सहायक निरीक्षक १
पोलीस निरीक्षक १
अप्पर महासंचालक १

Web Title: In 5 and a half years, 3 policemen end their lives! Causes work stress, family conflicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस