फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:05+5:302021-01-08T04:17:05+5:30
वाहनधारकांसाठी ११ जानेवारीपासून सवलत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाक्यांवर ११ ...
वाहनधारकांसाठी ११ जानेवारीपासून सवलत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाक्यांवर ११ जानेवारीपासून फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. फास्टॅग प्रणाली ही पथकर नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व वेगवान होण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महामंडळांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याअंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, वांद्रे-वरळी तसेच मुंबई एन्ट्री पॉइंटअंतर्गत वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहाद्दूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाका व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर, तळेगाव पथकर नाका, फूड मॉल, पेट्रोल पंपावर बँकांच्या मदतीने फास्टॅग स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे.
-------------------------
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या ५ टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांकरिता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे.
- विजय वाघमारे, सह-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
-------------------------