जुहूला समुद्रात ५ मुले बुडाली, एकाला वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 05:51 AM2023-06-13T05:51:38+5:302023-06-13T05:52:00+5:30

पाण्याचा अंदाज न आल्याने ती लाटेच्या प्रवाहाबरोबर बुडू लागली

5 children drowned in Juhu sea, local fishermen managed to save one | जुहूला समुद्रात ५ मुले बुडाली, एकाला वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश

जुहूला समुद्रात ५ मुले बुडाली, एकाला वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुहू येथील समुद्रात सायंकाळी १२ ते १५ वयोगटातील ५ मुले बुडाली. स्थानिक मच्छिमारांकडून एका मुलाला वाचविण्यात यश आले असून, वाहून गेलेली चार मुले अद्याप सापडलेली नाहीत. पालिकेचा आपत्कालीन विभाग, नेव्ही तसेच कोस्ट गार्डच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
जुहू कोळीवाडा येथील समुद्रात एकाच वयोगटातील मुले सायंकाळी समुद्रात साडेपाचच्या सुमारास पोहायला गेली होती. बिपरजॉय वादळामुळे किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला होता. यावेळी पोहण्यासाठी ही मुले समुद्रात उतरली.

पाण्याचा अंदाज न आल्याने ती लाटेच्या प्रवाहाबरोबर बुडू लागली. तेथील स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी समुद्राकडे धाव घेत त्यातील एकाला वाचविले. त्यानंतर आपत्कालीन विभाग, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 

आपत्कालीन विभाग, नेव्ही तसेच कोस्ट गार्डने शोधमोहीम हाती घेतली. जेट स्की, लाईफ जॅकेटची मदत घेत या मुलांचा शोध घेण्यात येत होता. मात्र, सोसाट्याचा वारा व खवळलेल्या लाटांमुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते. सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, मुलांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

बुडालेल्या मुलांची नावे- धर्मेश भुजिया (१५), मनीष भोगनिया (१५), शुभम भोगनिया (१६), जय ताजभरिया (१६)

या दुर्घटनेत वाचलेला मुलगा- दीपेश करन (१६)

(सर्व राहणार दत्त मंदिर रोड, वाकोला)

Web Title: 5 children drowned in Juhu sea, local fishermen managed to save one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई