५ ठेकेदारांना अटक

By admin | Published: January 24, 2016 01:16 AM2016-01-24T01:16:02+5:302016-01-24T01:16:02+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या उघडकीस आलेल्या नालेसफाई घोटाळ्याच्या कामात २४ ठेकेदारांनी ३६ कोटींचा घोटाळा केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत केलेल्या तपासातून समोर

5 contractors arrested | ५ ठेकेदारांना अटक

५ ठेकेदारांना अटक

Next

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या उघडकीस आलेल्या नालेसफाई घोटाळ्याच्या कामात २४ ठेकेदारांनी ३६ कोटींचा घोटाळा केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत केलेल्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हे शाखेने ५ कंत्राटदारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ३२ लाखांची रक्कम आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
पालिकेने गेल्या वर्षी केलेली नालेसफाईची कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे फोल ठरला होता. पालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. या प्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये नालेसफाईची कामे घेणारे कंत्राटदार यांनी गाळ उचलणारे वाहनचालक आणि कचऱ्याचे वजन करणारे कंत्राटदार यांच्या संगनमताने तब्बल १०० कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले. त्यानंतर पालिकेने तब्बल १४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या प्रकरणी दोषी ठरवत निलंबित केले.
पालिकेने केलेल्या तपासाअंती उपप्रमुख लेखापाल माधव केतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी सप्टेंबर २०१५ मध्ये नालेसफाईची कामे घेणारे कंत्राटदार, वाहनचालक आणि गाळाचे वजन करणारे कंत्राटदार यांच्याविरोधात फसवणूक आणि कट रचणे कलमान्वये गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये २४ कंत्राटदारांनी बनावट कागदपत्रे, गाड्या, नंबर आणि बनावट पावत्यांच्या आधारे तब्बल ३६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने सात कंत्राटदारांच्या घरी छापेमारी करून ३२ लाखांच्या रोख रकमेसह महत्त्वाची खरी आणि खोटी कागदपत्रे, फाइल्स, हार्ड डिस्क, मोबाइल फोन असा ऐवज जप्त केला. या प्रकरणी आतापर्यंत पाच कंत्राटदारांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)

असा केला घोटाळा...
नालेसफाईचे काम पूर्ण केल्यानंतर कंत्राटदारांनी सादर केलेल्या बिलामध्ये गाळ उचलण्यासाठी वापरलेल्या वाहनांचे दिलेले क्रमांक हे आॅटोरिक्षा आणि मोटारसायकलचे क्रमांक असल्याचे उघड झाले आहे. नालेसफाई दरम्यान गाळ उचलण्यासाठी गेलेल्या एका वाहनाचा क्रमांक दोन ठिकाणी वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच गाळ उचलणाऱ्या वाहनाच्या एका फेरीच्या जागी दोन ते तीन फेऱ्या दाखविण्यात आल्या होत्या.
गाळ उचलण्यासाठी गेलेल्या गाड्यांमध्ये १० टन गाळ मावत असताना २३ टन गाळ उचलल्याचे दाखविण्यासाठी वजन करणाऱ्या कंत्राटदारांना सामील करून घेण्यात आले आहे. वजन कंत्राटदारांनीसुद्धा जास्त वजनाच्या पावत्या दिल्या.

Web Title: 5 contractors arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.