मुंबईत दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:06 AM2021-07-28T04:06:48+5:302021-07-28T04:06:48+5:30
मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने यंत्रणांसह सामान्यांना दिलासा मिळत आहे. शहर उपनगरात मंगळवारी ३४३ रुग्ण आणि ...
मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने यंत्रणांसह सामान्यांना दिलासा मिळत आहे. शहर उपनगरात मंगळवारी ३४३ रुग्ण आणि पाच मृत्यूंची नोंद झाली, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
मुंबईत दिवसभरात ४६६ रुग्णांनी कोविडवर मात केली असून, आतापर्यंत ७ लाख ११ हजार ३१५ रुग्णांनी कोविडला हरविले आहे. सध्या केवळ ५ हजार २६७ रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने दिवसभरात २८ हजार ५८ चाचण्या केल्या असून, आजपर्यंत एकूण ८० लाख १८ हजार ३७७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहर उपनगरात सध्या ७ लाख ३४ हजार ७६१ कोरोना बाधित असून, मृतांची संख्या १५ हजार ७६९ आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले असून, २० ते २६ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १ हजार ३७७ दिवसांवर पोहोचला आहे. शहरात सध्या केवळ पाच प्रतिबंधित क्षेत्र असून, प्रतिबंधित इमारतींची संख्या ६१ इतकी आहे.
डेल्टाचे आणखी दोन रुग्ण
डेल्टाप्लस व्हेरीएंटचा आणखी दोन मुंबईकरांना संसर्ग झाला आहे. राज्यातील आरोग्य विभागानेही याला दुजोरा दिला आहे. यासह या प्रकाराची मुंबईत एकूण ३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीस, राज्यभरातून सुमारे ७ हजार ५०० नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी गेले होते, त्यापैकी २१ लोकांमध्ये डेल्टाप्लस रूपे सापडली, ज्यात रत्नागिरीत ९, जळगावमध्ये ७, पालघरमध्ये १, सिंधुदुर्गात १, ठाण्यात आणि मुंबईत १ अशा एका २१ नमुन्यांची नोंद झाली होती.