हरिभाऊ राठोडांविरोधात ५ कोटींचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:27 AM2018-05-18T02:27:48+5:302018-05-18T02:27:48+5:30
रेणके आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी रेणके आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी आमदार हरिभाऊ राठोड यांच्याविरोधात ५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.
मुंबई : रेणके आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी रेणके आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी आमदार हरिभाऊ राठोड यांच्याविरोधात ५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. रेणके आयोगामुळे भटका विमुक्त समाज सामाजिक न्यायापासून वंचित राहिल्याचा आरोप हरिभाऊ यांनी केल्याचे रेणके यांचे म्हणणे आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेणके यांनी ही माहिती दिली.
रेणके म्हणाले, गणेश देवी समितीचा अहवाल रेणके आयोगाने दडपल्याचा हरिभाऊ यांनी केलेला आरोप धादांत खोटा आहे. कारण ती आयोगाची सल्लागार समिती होती. तो अहवाल आयोगाच्या माहितीसाठी आणि निर्णय प्रक्रियेत आयोगास साहाय्यभूत होण्यासाठी होता. तो पुढे आणखी कोणाला पाठवण्याचे कोणाचेच आदेश नव्हते. त्यासंदर्भातील २९ आॅगस्ट २००६ रोजीचा केंद्र शासनाचा आदेश स्वयंस्पष्ट आहे. मात्र आपल्यासह आयोगाची बदनामी करण्यासाठी हरिभाऊ यांनी केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण मागणारी नोटीस याआधीच धाडल्याचे रेणके यांनी स्पष्ट केले.