मुंबई- सिद्धिविनायक मंदिरानं सरकारच्या शिवभोजन योजनेला थोडा थोडका नव्हे, तर 5 कोटींचा निधी दान स्वरूपात दिला आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकरांनी याची माहिती दिली आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनंही एवढा भरघोस निधी दिल्यानं या योजनेला आणखी चालना मिळणार आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या भक्तांनी दानपेटीत टाकलेली रक्कम ही या योजनेद्वारे गरजू नागरिकांच्या पोटीची भूक भागवणार असल्याने ही एकप्रकारे भगवंतांची सेवाच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपूर्वीच या योजनेतील थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली असून, ही संख्या 18 हजारांवरून 26 हजारांवर नेण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी केला आहे.
शिवभोजन केंद्रांना भेटअन्न, नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त तहसीलदार, गटविकास अधिकारी तथा समकक्ष अधिकाऱ्यांमार्फत शिवभोजन केंद्राची भेट व तपासणी आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी शिवभोजन केंद्रावरील स्वच्छता, नीटनेटकेपणा, अन्नाची गुणवत्ता या बाबींकडे लक्ष द्यावयाचे आहे. पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय कार्यालये, रुग्णालये बस आणि रेल्वे स्थानके, बाजारपेठा यासारख्या सार्वजनिक ठिकाणीच योजना राबविली जात असली तरी भविष्यात योजनेचा आणखी विस्तार करण्याचे नियोजित आहे.