माथाडी मंडळ ५ कोटी गायब प्रकरण :
या खात्यात गेले माथाडी मंडळाचे ५ कोटी !
आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू; ८ बनावट धनादेशांचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माथाडी मंडळाच्या खात्यातून गायब झालेले ५ कोटी रायपूर, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील खासगी शिक्षण समिती, बांधकाम आणि पुरवठादार कंपनीच्या खात्यात गेल्याचे समोर येत आहे.
सहायक कामगार आयुक्त तसेच रेल्वे गुड्स क्लीअरिंग ॲण्ड फाॅरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड, मुंबई या माथाडी मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरुन पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
मशीद बंदर येथे असलेल्या बँक ऑफ बडाेदाच्या बचत खात्यातून या वर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशाद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आल्याने खळबळ उडाली. यात, ८ बनावट धनादेशांचा वापर करण्यात आला होता. हे पैसे मध्य प्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील वेगवेगळ्या खात्यात गेले आहेत. यापैकी रशीद खान कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ४६ लाख, अरुणोदय शिक्षण समिती, डोंगरगाव-भिलाईच्या खात्यात १ कोटी ३१ लाख ८२ हजार, जय शक्ती कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ६५ लाख २१ हजार, कौशलेंद्र देकाते-बालाघाटच्या खात्यात १ कोटी ९१ लाख ४२ हजार, मे. महर्षी इंटरप्रायजेस जनरल सप्लायर्स, बालाघाट या खात्यात १ लाख ६० हजार हे पैसे गेल्याचे समोर आले आहे.
संबंधित आरोपींनी या मंडळाच्या बचत खात्यामधून पैसे नमूद बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच इतर अनोळखी व्यक्तींशी संगनमत करून मंडळाचे बनावट धनादेश व स्वाक्षरीद्वारे ५ कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. या बँक खात्याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
* असे जमा केले पैसे
रशीद खान कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ४६ लाख
अरुणोदय शिक्षण समिती, डोंगरगाव - भिलाईच्या खात्यात १ कोटी ३१ लाख ८२ हजार
जय शक्ती कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ६५ लाख २१ हजार
कौशलेंद्र देकाते - बालाघाटच्या खात्यात १ कोटी ९१ लाख ४२ हजार
मे. महर्षी इंटरप्रायजेस जनरल सप्लायर्स, बालाघाट खात्यात १ लाख ६० हजार