Join us

माथाडी मंडळाच्या खात्यातून ५ कोटी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:06 AM

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू, बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कटमनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माथाडी मंडळाच्या ...

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू, बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कट

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माथाडी मंडळाच्या बचत खात्यातून

बनावट धनादेशद्वारे तब्बल ५ कोटी ६ रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पैसे मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

सहायक कामगार आयुक्त अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ फेब्रुवारीपासून रेल्वे गुडस्‌ क्लीअरिंग अँँड फाॅरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड, मुंबई या माथाडी मंडळाचा अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. ८ फेब्रुवारीपासून ते या पदावर कार्यरत आहेत.

याच मंडळाचे बचत खाते मस्जिद बंदर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत आहे. डोके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात बँक खात्याचा तपशील मागवला. यात, पासबुक नोंदीतून समोर आलेल्या माहितीत यावर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशाद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्स्फर करण्यात आल्याचे दिसून आले.

त्यांनी तात्काळ याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, हे पैसे बँकेकडून बँकेच्याच मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील शाखेत वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यात, मंडळाच्या बनावट धनादेश आणि स्वाक्षरीचा वापर करण्यात आला. याचे मूळ धनादेश मंडळाकडे आहेत. अशात, एवढ्या मोठ्या स्वरूपात रक्कम ट्रान्स्फर होत असताना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

अशात, बँक ऑफ बडोदा यांचे संबंधित शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, अधिकारी व इतर अनोळखी इसम यांनी एकमेकांशी फौजदारी कट रचून व संगनमत करून फसवणुकीच्या उद्देशाने व सदरच्या रकमेचा अपहार केल्याचा संशय वर्तवत त्यांनी तात्काळ पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार ६ एप्रिल रोजी पायधुनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दुधगावकर यांनी दुजाेरा दिला. ते पैसे गोठविण्यात आले असल्याची माहितीही समोर आली आहे.

खात्यातील पैसे दुसरीकडे वर्ग

बनावट धनादेशद्वारे मंडळाचे पैसे वर्ग केल्याचे समजताच तातडीने पोलिसांत तक्रार देत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संबंधित खात्यांतील उर्वरित रक्कम अन्य खात्यांत वर्ग केली असून, खात्यात फक्त ८ हजार रुपये ठेवले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा लवकरच याचा तपास लावेल असा विश्वास आहे.

-अशोक लक्ष्मण डोके,

प्रभारी अध्यक्ष, माथाडी मंडळ

............................