‘त्या’ व्यापाऱ्यांना हायकोर्टाने ठोठावला पाच कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 06:09 AM2019-04-25T06:09:37+5:302019-04-25T06:10:00+5:30
रक्कम टाटा कर्करोग इस्पितळास दान; निकृष्ट दर्जाचा माल परदेशात विकून भारताचे नाव केले बदनाम
मुंबई : हलक्या प्रतीचा निकृष्ट माल स्थानिक बाजारातून खरेदी करून, तो नामांकित कंपन्यांच्या नावे परदेशात विकून आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे नाव बदनाम करणाºया, नवी मुंबईतील कळंबोली येथील लोखंड आणि पोलाद बाजारातील व्यापाऱ्यांना तब्बल पाच कोटी रुपयांचा दंड करून, मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच अद्दल घडविली. दंडाची ही रक्कम टाटा कर्करोग इस्पितळास दान म्हणून देण्यात आली.
मोठमोठ्या कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाºया उत्कृष्ट दर्जाच्या पोलादी पाइपचे उत्पादन करणाºया मे. निप्पॉन स्टील अँड सुमीमोटो मेटल कॉर्पोरेशन या कंपनीने दाखल केलेल्या प्रकरणात न्या. एस. जे. काथावाला यांनी हा आदेश दिला. त्यानुसार, किशोर जैन, जितेंद्र बुराड व हरीश बुराड या कळंबोली स्टील मार्केटमधील व्यापाºयांना दाव्याच्या खर्चापोटी पाच कोटी रुपये भरण्यास सांगण्यात आले.
या तिघांनी फसवणूक केल्याचे कबूल करून, यापुढे व्यापारात असा अप्रामाणिकपणा न करण्याची लेखी ग्वाही दिली. तरीही त्यांच्याप्रमाणेच लबाडी करणाºयांनाही धडा मिळावा, यासाठी त्यांना एवढ्या मोठ्या रकमेचा भुर्दंड सोसायला लावणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने नमूद केले. यामुळे जगात भारताचे नाव बदनाम होते. एवढेच नव्हे, तर निकृष्ट दर्जाचे पाइप तेलशुद्धीकरण कारखान्यासारख्या संवेदनशील प्रकल्पाच्या उभारणीसाठी वापरल्याने प्रसंगी अपघात होऊन मोठा अनर्थ होण्याचा धोकाही संभवू शकतो, याचीही न्या. काथावाला यांनी नोंद घेतली.
सौदी अरबस्तानातील मे. यान्बू स्टील कंपनीस या तिघांनी मार्च, २०१६ मध्ये सीमलेस कार्बन स्टील पाइप विकले होते. हे पाइप निप्पॉन स्टील कंपनीने तयार केले आहेत, असे भासवून ही विक्री करण्यात आली होती. नंतर हे पाइप सौदीमधील एका तेल कारखान्यात बसविले गेले. कालांतराने ते खराब आणि निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी आल्या. यान्बू कंपनीने निप्पॉन कंपनीस ही गोष्ट कळविली. मात्र, ज्यांनी हे पाइप आपल्या नावाने विकले, ते आपले अधिकृत एजंट व विक्रेता नाहीत, हे निप्पॉन कंपनीच्या चौकशीअंती लक्षात आले. त्यातून त्यांनी बनावट माल आपल्या नावाने विकून स्वामित्व हक्काचा भंग केल्याबद्दल या व्यापाºयांविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला.
किशोर जैन व बुराड बंधुंनी न्यायालयात दिलेल्या लेखी कबुलीनुसार, त्यांनी यान्बू कंपनीस विकलेले हे पाइप निप्पॉन कंपनीने तयार केलेले नव्हतेच. त्यांनी हे हलक्या प्रतीचे पाइप भन्साळी इम्पेक्स अँड महालक्ष्मी इंडस्ट्रिज, चॅम्पियन ट्युब्ज अँड अॅलॉइज प्रा. लि. व सॅटेलाइट ट्रेड इंम्पेक्स या स्थानिक कंपन्यांकडून घेतले होते. या पाइपवर त्यांनी निप्पॉन कंपनीचे लोगो व ट्रेडमार्क एम्बॉस केले. एवढेच नव्हे, तर या पाइपची दर्जा तपासणी केली आहे व ते चोख दर्जाचे आहेत, अशी निप्पॉन कंपनीच्या सही-शिक्क्यांची बनावट प्रमाणपत्रे बेमालूमपणे तयार करून, तीही मालासोबत सौदी खरेदीदाराकडे पाठवून दिली.
न्यायालयाने दाव्यात सुरुवातीस ‘कोर्ट रीसिव्हर’ नेमून या व्यापाºयांच्या कार्यालये व गोदामांची तपासणी केली. त्यातून त्यांचे हे फसवणुकीचे धंदे सन २०१० पासून सुरू असल्याचे निष्पन्न झाले. बनावट माल व त्यासाठी वापरले गेलेले संगणक व अन्य साहित्यही जप्त करण्यात आले.
‘माणसाची अमर्याद हाव’
‘ही पृथ्वी सर्वांच्या गरजा भागवू शकते, पण एका व्यक्तीची हाव पूर्ण करण्यास मात्र ती अपुरी आहे,’ हे महात्मा गांधीचे वचन उद््धृत करून न्या. काथावाला यांनी या निकालाची सुरुवात केली. ते म्हणाले की, झटपट श्रीमंत होण्यासाठी माणूस कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो, याचे हे प्रकरण म्हणजे उत्तम उदाहरण आहे. पैशांच्या मागे लागून लबाडी करणाºया या लोकांना आपल्यामुळे जगात देशाची बदनामी होते व इतरांचे प्राणही प्रसंगी धोक्यात येऊ शकतात, याचा काहीही विधिनिषेध नसतो.