मुंबई : कोरोनाच्या अनुषंगाने रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नसल्यास ५ दिवस गृहविलगीकरण ठेववावेत. तसेच कोरोनची लक्षणे असलेल्या रुग्णांनी इतरांना संसर्ग पसरू नये म्हणून मास्कचा वापर करावा. या अशा पद्धतीच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्स ने केल्या आहेत. तसेच पर्यटनासाठी गेलेले पर्यटक घरी परतले आहे. त्याच्या द्वारे संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस महत्त्वाचे असल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे.
कोरोनाची नवीन रुग्णांची संख्या वाढत असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मित केली आहे. या टास्कफोर्सची पहिली बैठक मंगळवारी डॉ रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी सर्दी ताप खोकला सारखी लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच चाचणी पॉजिटीव्ह असल्यास संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करून घ्यावी. नजीकच्या रुग्णालयात जाऊन चाचणी करून घ्यावी. अतिजोखिमीच्या व्यक्तींची चाचणी पॉजिटीव्ह आल्यास वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
या बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, बी जे मेडिकल कॉलेजचे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजेश कार्यकर्ते, पुणे येथील एनआयव्ही संस्थेतील डॉ वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज येथील डॉ डी बी कदम आणि पुणे येथील साथरोग तज्ज्ञ डॉ संजय पुजारी उपस्थित होते.