रेखाकला परीक्षेचे प्रस्ताव सादर करण्यास ५ दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:29+5:302021-06-25T04:06:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे कलागुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी परीक्षा दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे कलागुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी परीक्षा दिली आहे मात्र यंदा कोरोनामुळे इंटरमिजिएट परीक्षा देता आली नाही त्यांना त्यांच्या एलिमेंटरी परीक्षेच्या श्रेणीवरून इंटरमिजिएटची श्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना त्यासाठीचे प्रस्ताव शाळेत सादर करण्यासाठी २५ ते ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २८ जून ते २ जुलैदरम्यान शाळांनी विभागीय मंडळांकडे हे प्रस्ताव सादर करायचे आहेत. मात्र ही वेळ फारच कमी असून, जे विद्यार्थी अद्याप शहरात किंवा जिल्ह्यात नाहीत त्यांचे नुकसान होण्याची भीती मुख्याध्यापक, शिक्षकांनी केली आहे. यामुळे गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
दरवर्षी दहावीत कला आणि क्रीडा क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यांच्या कामगिरीप्रमाणे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात, ज्याचा उपयोग त्यांना आपल्या या क्षेत्रातील पुढील करिअरसाठी तर होतोच शिवाय दहावीच्या निकालात गुणपत्रिकांतही निश्चितच होतो. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे कला संचालनालयाकडून एलिमेंटरी व इंटरमिजिएट या कला परीक्षा आयोजित न केल्याने त्यांचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र यासंदर्भात अनेक निवेदने कलाशिक्षक, संघटना आणि विद्यार्थी-पालकांकडून शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आली होती. अखेर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाने आपला आधीचा गुण न देण्याचा निर्णय अधिक्रमित करून नवीन निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
चौकट
कसे मिळतात सवलतीचे कला गुण
दहावी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यास ७ गुण प्राप्त होतात
दहावी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत बी ग्रेड मिळाल्यास ५ गुण प्राप्त होतात
दहावी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत सी ग्रेड मिळाल्यास ३ गुण प्राप्त होतात
तसेच विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळत नाहीत.