मुंबई : २०२३ च्या वर्षात मुंबई शहर, उपनगरे आणि महामुंबईत मिळून दीड लाखापेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थचक्र रुळांवर आले आहे. एकीकडे किमती वाढल्या तरी घरांच्या खरेदीतही वाढ झाली आहे. विशेषत: शहर आणि उपनगरांमध्ये आलिशान ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे निवासस्थान आहेत. मलबार हिल, कफ परेड, जुहू, वांद्रे आणि वरळी या ठिकाणी घर खरेदीला सर्वाधिक पसंती आहे.
रिअल इस्टेटच्या दृष्टीने पाहिले तर मुंबई देशातील सर्वात महागडं शहर आहे. कोरोनानंतर देशात घर बांधकामाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे घरही महाग झाले आहे
ट्रेंड बदलला :-
सन २०२३ मध्ये घर खरेदीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहे. २०२३ च्या वर्षात मुंबई व उपनगरांत ज्या घरांची विक्री झाली त्यामध्ये २० टक्क्यांपर्यंत घरांच्या विक्रीचे प्रमाण हे २ बीएचके घरांचे आहे. ज्यांच्या किमती उपनगरांत ७५ लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत गेल्या आहेत, तर मुंबई शहरात याच किमती ८० लाख ते पावणेदोन कोटी रुपयांपर्यंत आहेत.
का वाढल्या किमती ?
शहर व उपनगरांमध्ये भूखंडांचे प्रमाण मर्यादित आहे आणि मागणी जास्त प्रमाणात असल्याने त्याचा थेट परिणाम किमतीवर हाेत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्यामुळे सेवा-सुविधांतदेखील वाढ होत आहे. यामुळे घरांच्या किमतीमध्ये वाढ होत आहे.