मनोहर कुंभेजकर
मुंबई : वेसावे कोळीवाड्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी रेड झोनमध्ये असलेल्या वेसावा कोळीवाड्यात कोरोना स्क्रिनिंग व्यतिरिक्त सामान्य रुग्णांची तपासणी व्हावी म्हणून पाच फिव्हर क्लिनिक आज पासून सुरू करण्यात आली आहेत.
वेसावा गावात ४० हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत,तर ६० हून अधिक नागरिकांना त्यांच्या घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे. वेसावा गाव लॉकडाऊन असल्याने येथील सर्व स्थानिक दवाखाने बंद होते.त्यामुळे स्थानिक पेशंटची गैरसोय होऊन कोरोनाची भीती निर्माण होण्याबरोबर वाढत्या कोरोना संशयितांची तपासणीची सुविधा येथे उपलब्ध नव्हती.सदर बाब लक्षात घेऊन वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या पुढाकाराने येथे ५ फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत.या दवाखान्यांना मुंबई महानगरपालिकेने सहकार्य केले असून येथील समाजसेवक आणि क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे मुख्याध्यापक अजय कौल यांनी मदत केली आहे.
डॉ मल्लिनाथ, डॉ दिपेश वाघमारे, डॉ विशाल पुंडे, डॉ फातिमा खान, डॉ.कलीम यांच्या प्रमुखत्वाखाली येथील क्लिनिक सुरू राहणार आहेत. या क्लिनिकना पीपीई किट्स व साहित्य सुविधा वाटप वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी राजहंस टपके, डॉ.चारूल भानजी, ओमकार भीमंबाले,नंदू भावे, दक्षित टिपे, गणेश गणेकर,राजन मुंबईकर,पराग शिपे आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील बुधा गल्ली येथे डॉ फातिमा खान या सकाळी १० ते १ या वेळेत उपलब्ध राहणार असून , पाटील गल्लीत डॉ.कलीम हे सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत, सायंकाळी ५ ते ८ यावेळी डॉ.दीपेश वाघमारे हे डोंगरी गल्ली येथे क्लिनिक उघडणार असून सायंकाळी खास पुण्यातून आलेले सात ते दहा डॉक्टर हे बाजार गल्ली येथे नागरिकांना तपासणार आहेत.तर रात्री ८ ते १० डॉ.मल्लिनाथ हे मांडवी गल्ली फेरीबोट मार्गावर तपासणी करणार आहेत.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भावाला वेळीच अटकाव होणार असल्याने वेसाव्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना वेसावा कॉलेज अमान ट्रस्टने व्यक्त केली आहे.