Join us  

पुलाच्या कामासाठी ५ तासांचा मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 6:06 AM

मस्जिद बंदरमध्ये काम उद्यापासून सुरू : २, १२ डिसेंबरला ब्लॉकदरम्यान लोकल सेवा बंद

मुंबई : मस्जिद बंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील पादचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने हा पूल तोडून नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सोमवारपासून या कामास सुरुवात होईल. तसेच २ व १२ डिसेंबर रोजी मशीद स्थानकात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

२ डिसेंबर (रविवार) व १२ डिसेंबरला (बुधवारी) मध्य रेल्वेच्या अप व डाऊन मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील अप व डाऊन मार्गावर पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉक नेमका कोणत्या वेळेत घेण्यात येणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु ज्या कालावधीत तो घेण्यात येईल त्या दरम्यान लोकल गाड्या केवळ भायखळ्यापर्यंतच चालवण्यात येतील. धिम्या मार्गावरील वाहतूक सीएसएमटी ते भायखळा या स्थानकांदरम्यान बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत जलद मार्गावरून विशेष जलद सेवा उपलब्ध असेल.सध्या पादचारी पूल २.४४ मीटर आहे, त्यामध्ये वाढ करून ४.८८ मीटर करण्यात येणार आहे. जिन्याची रुंदी २.४४ मीटरवरून ३.६६ मीटर करण्यात येईल. दुसºया बाजूकडील १.८० मीटरच्या पायऱ्यांची रुंदी वाढवून २.३० मीटर करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रात्रीही काम करण्यात येईल. पादचारी पुलावरील आरक्षण केंद्र या कालावधीत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण दिशेकडील आरक्षण कार्यालयात अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू राहतील. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून टीसी व आरपीएफ कर्मचाºयांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येईल. या पुलाशिवाय आणखी दोन पादचारी पूल सध्या स्थानक परिसरात आहेत. त्यामुळे प्रवाशांना फारसा त्रास होणार नाही, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला.