मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 05:44 AM2024-09-28T05:44:00+5:302024-09-28T11:23:08+5:30
सकाळी ११:०५ पासून ते दुपारी ३:५५ या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई :मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११:०५ पासून ते दुपारी ३:५५ या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व मुलुंडपुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या कालावधीत ब्लॉक असल्यामुळे वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यानची सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि कुर्ला-पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी १० या कालावधीत १० तासांचा मेजर ब्लॉक आहे.
ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक
अंधेरी ते गोरेगावदरम्यान अप-डाऊन हार्बर मार्गांवर नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी रविवारी रात्री विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर रात्री साडेबारा ते सकाळी साडेदहा दरम्यान १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अंधेरी ते गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक आधीची गोरेगावसाठीची शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री १०:५४ ला तर गोरेगाववरून सीएसएमटीसाठीची शेवटची लोकल रात्री १२ला सुटणार आहे.