तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत ५ जम्बो केंद्र तयार, १०५ कोटींचे कंत्राट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 09:55 PM2021-12-29T21:55:14+5:302021-12-29T21:55:33+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मुंबईत खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवल्याने महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरु केली. एमएमआरडीए आणि सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केंद्रांची देखभाल खासगी संस्थांकडे सोपविण्यात आली आहे
मुंबई - कोविड रुग्णांची संख्या दोनशेवरुन आता दोन हजारांवर पोहोचल्याने महापालिकेने पाच जम्बो कोविड केंद्र सुरु करण्याची तयारी केली आहे. या केंद्रांची देखभाल व वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका संबंधित वैद्यकीय संस्थेला १०५ कोटी रुपये देणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी अथवा जोपर्यंत कोविडचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत या केंद्रांची जबाबदारी संबंधित खासगी वैद्यकीय संस्थेकडे असणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मुंबईत खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवल्याने महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरु केली. एमएमआरडीए आणि सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केंद्रांची देखभाल खासगी संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. मात्र रुग्ण संख्येत घट झाल्यानंतर यापैकी पाच केंद्रे बंद करण्यात आली. परंतु, मागील आठड्यापासून रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे बंद जम्बो कोविड केंद्रे देखील सुरु करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी विनाचर्चा मंजूर करण्यात आला. बीकेसी, दहिसर, मालाड, कांजूरमार्ग व सोमय्या या ठिकाणी हे पाच जंबो कोविड सेंटर कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. या सेंटरच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी ७४८ आयसीयू खाटा, २०९९ ऑक्सिजन खाटा, ८०१ विना ऑक्सिजन खाटा, १०० पेड्रियाटीक आयसीयू खाटा, २० डायलिसिस ( आयसीयू) खाटा, १०० पेड्रियाटीक खाटा उपलब्ध होणार आहेत.
* महापालिका प्रति आयसीयू खाटासाठी प्रति दिन सहा हजार रुपये, ऑक्सिजन खाटासाठी एक हजार ५०० रुपये तर विना ऑक्सिजन खाटासाठी ८०० रुपये मोजणार आहे.
* बीकेसी कोविड केंद्र - ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. ( कंत्राट रक्कम ३४ कोटी ५१ लाख रुपये)
दहिसर कोविड केंद्र - लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस (कंत्राट रक्कम १४ कोटी ०५ लाख रुपये),
सोमय्या कोविड केंद्र - अपेक्स हॉस्पिटल मुलुंड - (कंत्राट रक्कम ५ कोटी ६३ लाख रुपये),
कांजूरमार्ग कोविड केंद्र - मेडटायटन्स मॅनेजमेंट (कंत्राट रक्कम २८ कोटी २३ लाख रुपये)
मालाड कोविड केंद्र - कंत्राटकाम रुबी ऍलकेअर सर्व्हिसेस ( कंत्राट रक्कम २२ कोटी ४७ लाख रुपये)