उल्हासनगरात स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:06 AM2021-05-16T04:06:24+5:302021-05-16T04:06:24+5:30

११ जण जखमी : धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. १ परिसरातील ...

5 killed in Ulhasnagar slab collapse | उल्हासनगरात स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू

उल्हासनगरात स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू

Next

११ जण जखमी : धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. १ परिसरातील मोहिनी पॅलेस या चारमजली इमारतीच्या गच्चीचा स्लॅब कोसळून शनिवारी झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर ११ जण जखमी झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं. १ परिसरात मोहिनी पॅलेस ही चारमजली इमारत १९९४ मध्ये बांधण्यात आली आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास इमारतीच्या गच्चीचा स्लॅब चौथ्या, तिसऱ्या, दुसऱ्या, पहिल्या व तळमजल्यावर पत्त्याच्या बंगल्यासारखा येऊन कोसळला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. भीतीने नागरिक पळत सुटले. स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत आल्याने, इमारतीमधील २० ते २५ नागरिक यामध्ये अडकल्याची भीती सुरुवातीला व्यक्त केली जात होती. महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. या इमारतीत ९ सदनिका आणि तळमजल्यावर ८ दुकाने असल्याची माहिती सहायक आयुक्त शिंपी यांनी दिली. इमारतीच्या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. मदतकार्य सुरू असताना, आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, मदतकार्याला वेग आला.

मोहिनी पॅलेस इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळताच इमारतीमधील रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोघांना खिडकीचे गज कापून बाहेर काढावे लागले. १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले. तळमजल्यावर ५ ते ६ रहिवासी अडकल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यापैकी दोघांचे मृतदेह सुरुवातीला बाहेर काढले. नंतर ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले, तसे आणखी तीन मृतदेह हाती लागले. दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी कोण अडकले आहे का, याचा शोध रात्री उशिरापर्यंत घेतला जात होता.

महापालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बेघर झालेल्या नागरिकांना संत थारासिंग दरबार यांनी मदतीचा हात दिला असून, महापालिका त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दुर्घटनेत मृतांची नावे

मॉन्टी मिलिंद पारचे (१२), सावित्री पारचे (६०), हरेश डोडवाल (५२), ऐश्वर्या हरेश डोडवाल (२३), संध्या हरेश डोडवाल (५०).

Web Title: 5 killed in Ulhasnagar slab collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.