वांद्रे ते माहीम किल्ल्यापर्यंत पाच कि.मी.चा सायकल ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:02+5:302021-01-21T04:07:02+5:30

प्राथमिक अभ्यास सुरू : झाकोळलेल्या माहीम चौपाटीचे सौंदर्य पुन्हा बहरणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अतिक्रमणामुळे झाकोळलेले माहीम चौपाटीचे ...

5 km cycle track from Bandra to Mahim fort | वांद्रे ते माहीम किल्ल्यापर्यंत पाच कि.मी.चा सायकल ट्रॅक

वांद्रे ते माहीम किल्ल्यापर्यंत पाच कि.मी.चा सायकल ट्रॅक

googlenewsNext

प्राथमिक अभ्यास सुरू : झाकोळलेल्या माहीम चौपाटीचे सौंदर्य पुन्हा बहरणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अतिक्रमणामुळे झाकोळलेले माहीम चौपाटीचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा बहरणार आहे. मुंबईतील पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या या चौपाटीवर ११०० झाडांचे रोपण करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्याचबरोबर वांद्रे किल्ला ते माहीम किल्ल्यापर्यंत पाच कि.मी. सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे या प्रकल्पावर विशेष लक्ष असल्याने पालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

माहीम चौपाटीवर गेल्या काही वर्षांमध्ये अतिक्रमण वाढल्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य हरपले होते. मात्र या चौपाटीचे जुने वैभव परत मिळवून मुंबईतील आकर्षक पर्यटनस्थळ बनवण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. यासाठी सर्वप्रथम अतिक्रमण हटवून माहीम रेतीबंदरच्या ३० हजार चौ.फुटांच्या किनारपट्टीवर माहीम समुद्रकाठची वाळू आणली. तसेच पर्यावरणाचा समतोल व चक्रीवादळाच्या दरम्यान संरक्षक ठरणाऱ्या सुरूची अडीचशे झाडे चौपाटीवर लावण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी चार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून वास्तुविशारद राजमुद्रा आणि लँडस्केप डिझायनर्स यांनी आराखडा तयार केला आहे.

त्याचबरोबर वांद्रे ते माहीम किल्ल्यापर्यंत सायकल ट्रॅक सुरू करण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. त्यानुसार या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकल्पाचा प्राथमिक अभ्यास सुरू असून लवकरच त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. समुद्रकिनारी शेकडो वृक्षांमध्ये निसर्गाचा आनंद लुटणे मुंबईकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. सायकलपटू या मार्गावर जाताना निसर्गाचा आनंद घेऊ शकतील, असा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला.

काेरोनामुळे काम पडले होते लांबणीवर

* प्रकल्पाअंतर्गत चौपाटीवर संरक्षक भिंत बांधणे, वॉच टावर, पायवाट तयार करणे, बांबूंचे कुंपण, कलाकृती, पर्जन्यवाहिन्यांची व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. या प्रकल्पाला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र सागरी नियंत्रण व्यवस्थापन प्राधिकरण यांची मंजुरी मिळाली आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले होते.

असा होणार चौपाटीचा कायापालट

अतिक्रमणापासून संरक्षण, गैरकृत्यांवर निर्बंध आणणे आणि स्थानिक परिसराचा आर्थिक स्तर उंचावणे, या उद्देशाने माहीम चौपाटीचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. माहीम रेतीबंदर येथे ११०० झाडे लावण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. यामध्ये अडीचशे सुरूची झाडे, दोनशे चाफ्याची झाडे, साडेतीनशे टीकम आणि बांबूची साडेतीनशे झाडे लावली जाणार आहेत.

Web Title: 5 km cycle track from Bandra to Mahim fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.