मुंबई : आपल्या वाहनांवर व्हीआयपी नंबर असावेत ही क्रेझ असते. यातून परिवहन विभागाला महसूलही मिळतो. असे व्हीआयपी क्रमांक मिळावा म्हणून अतिरिक्त फी मोजण्यास तयार असणाऱ्यांना हे व्हीआयपी स्टेटस टिकवण्यासाठी आणखी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. व्हीआयपी नंबर शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवला आहे. यात चारचाकी गाड्यांच्या ०००१ व्हीआयपी नंबर घेण्यासाठी शुल्क ३ लाखांवरून पाच लाख प्रस्तावित आहे.
दुचाकी, कार, ट्रक, रिक्षा, टॅक्सी आदी वर्गवारीतील वाहनांसाठी व्हीआयपी क्रमांक मिळवण्याची सुविधा आहे. त्यासाठी जास्त पैसे मोजण्याची हौशी मंडळींची तयारी असते. या क्रमांकांवरील शुल्कापोटी परिवहन विभागाला वर्षाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. राज्यातील सर्वच परिवहन केंद्रांवर व्हीआयपी क्रमांक उपलब्ध असतात. असे क्रमांक मिरवणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक आहे. १ या व्हीआयपी क्रमांकासाठी सर्वाधिक शुल्क आकारले जाते.
कारसाठी १ या व्हीआयपी क्रमांकासाठी ३ लाखऐवजी ५ लाख, दुचाकी आणि तीनचाकींना ५० हजारांऐवजी १ लाख रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, रायगड, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी व्हीआयपी क्रमांकाची मागणी जास्त आहे. याठिकाणी ०००१ क्रमांकासाठी ४ लाखांऐवजी ६ लाख शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे, तर सिरीजमध्ये नसणाऱ्या व्हीआयपी नंबरसाठी १८ लाख मोजावे लागणार आहेत. राज्यात २४० वेगवेगळे क्रमांक हे व्हीआयपी क्रमांकाच्या यादीत आहेत. ०००१ नंतर ९९९, १११, २२२, ३३३, ७८६ या क्रमांकाची जास्त विक्री होते.
इतर गाड्यांसाठी असे असतील दर...या पाच क्रमांकासाठी चारचाकीला २.५ लाख, दुचाकी, तीन चाकीला ५० हजार शुल्क प्रस्तावित आहे. तर १६ क्रमांकासाठी चारचाकीला १ लाख, दुचाकी, तीनचाकीला २५ हजार शुल्क आकारले जाणार आहे. इतर ४९ क्रमांकासाठी चारचाकीला ७० हजार, दुचाकी, तीनचाकीला १५ हजार शुल्क प्रस्तावित आहे. तर ००११, ००२२, ००८८, ०२००, ०२००, ०२०२, ४२४२, ५६५६, ७३७४ या सारख्या १८९ क्रमांकासाठी चारचाकी आणि मोठी वाहने १५ हजार, दुचाकी, तीनचाकीला ६ हजार शुल्क आकारले जाणार आहे.