रिक्षात विसरले ५ लाखांचे हिरे, पोलिसांनी रिक्षावाल्यास शोधून केले रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 01:53 PM2022-02-05T13:53:16+5:302022-02-05T14:10:40+5:30
लुनावत यांनी तात्काळ भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रिक्षात हिरे व कागदपत्र असलेली बॅग राहून गेल्याचे सांगितले.
मीरारोड - रिक्षात मागच्या बाजूला विसरलेली ५ लाखांचे हिरे व कागदपत्रे असलेली बॅग भाईंदर पोलिसांनी शोधून प्रवाशास परत केली. राहुल लुनावत (३४) हे पत्नी, लहान मुली सोबत गुरुवारी कांदिवली ते भाईंदर असा रिक्षातून प्रवास करत होते. रिक्षाच्या मागील भागात ठेवलेली ५ लाखांचे हिरे व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग घाईगडबडीत भाईंदर मध्ये उतरताना विसरले. रिक्षा निघून गेल्यावर लुनावत यांना हिरे रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले.
लुनावत यांनी तात्काळ भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रिक्षात हिरे व कागदपत्र असलेली बॅग राहून गेल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी विषयाचे गांभीर्य पाहता उपनिरीक्षक किरण कदम सह गजानन चव्हाण, नितीन बोरसे यांच्या पथकास तात्काळ शोध घेण्यास सांगितले. लुनावत ज्याठिकाणी उतरले तेथे पोलिसांनी जाऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. ५ ते ६ ठिकाणचे फुटेज पाहिल्यावर पोलिसांना त्या रिक्षाचा क्रमांक सापडला.
वाहतूक पोलीस अनिल चव्हाण यांच्या मदतीने पोलिसांनी त्या रिक्षाच्या मालकाचा पत्ता मिळवला. कांदिवलीच्या ठाकुर विलेज भागात जाऊन शोध घेतला असता पहिल्या मालकाकडून दुसऱ्या मालकाची माहिती मिळाली. त्याच्याकडून रिक्षा चालकाशी संपर्क केला. पोलिसांनी रिक्षा गाठली असता रिक्षाच्या सीट मागील भागात ती हिरे व कागदपत्रांची लहानशी बॅग तशीच पडलेली होती. रिक्षा चालकाससुद्धा प्रवाश्याची बॅग राहिल्याची कल्पना नव्हती. दरम्यान, भाईंदर पोलीसांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने १० तासात हिरे शोधून लुनावत यांच्या स्वाधीन केले. ५ लाखांचे हिरे विसरल्याने चिंतीत असलेल्या लुनावत व कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.