मुंबई: वडाळा घाटकोपर ठाणे मेट्रो ४ च्या कामानिमित्त उभारण्यात आलेल्या पत्र्याला स्पर्श झाल्याने १४ वर्षीय बालकाच्या मृत्यू प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी दोघा सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापुढे अशी दुर्घटना घडू नये म्हणून बांधकाम ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असून याप्रकरणी एमएमआरडीएने कंत्राटदार मिलन रोड बिल्डटेक एलएलपीला ५ लाखांचा आणि प्रकल्प सल्लागाराला १ लाखांचा दंड ठोठावला आहे.
वडाळा घाटकोपर ठाणे या मेट्रो ४ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवडी रोड ते चेंबूर येथून येणारा हा मार्ग आणिक आगार जवळून वळतो व पूर्व द्रुतगती महामार्गावरून अमरमहलच्या दिशेने पुढे जातो. या मार्गावरील सिद्धार्थ कॉलनी येथील मेट्रोच्या पिलर क्रमांक पी १३२ येथे प्रज्वल नखाते (१४) हा आपल्या मित्रांसमवेत खेळायला गेला असताना लोखंडी पत्र्याला त्याचा स्पर्श झाला व शॉक लागल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराच्या सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल केल्या नंतर एमएमआरडीएने सुद्धा संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली.
मेट्रो ४ मार्गिकेच्या सल्लागाराला याप्रकरणी तात्काळ सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना एमएमआरडीएने दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजरवर तात्काळ कारवाईचे आदेश एमएमआरडीएने कंत्राटदाराला दिले आहेत. सविस्तर अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती एमएमआरडीए कडून देण्यात आली असून यापुढे अशी दुर्घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल तशा सूचना संबंधित देण्यात आल्या आहेत असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.