लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केईएम रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे अवघ्या ५२ दिवसांच्या लहानग्याचा हात कापावा लागल्याची गंभीर घटना ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात उजेडात आणली होती. या प्रकरणाची दखल घेत, मुंबई महापालिका प्रशासनाने चार वरिष्ठ प्राध्यापकांचा समावेश असलेली समिती नेमून चौकशीचे आदेश दिले. मुख्यमंत्री कार्यालयानेही या घटनेची दखल घेत, दुर्दैवी बालकाच्या पालकांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाखांचा धनादेश पालकांकडे सुपुर्द केला.
‘केईएम हॉस्पिटलच्या बेफिकिरीमुळे ५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात कापावा लागला’ अशा मथळ्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, खळबळ उडाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी बाळाच्या आई-वडिलांची भेट घेऊन बाळावर शक्य आहेत, तेवढे सर्व उपचार करण्याचे आश्वासन दिले. डॉ.सुधाकर शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक ते औषधोपचार देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयानेही या प्रकरणाची दखल घेत, संपूर्ण माहिती पालिका प्रशासनाकडून घेतली. या प्रकरणी डॉ.सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री कार्यालयातून बाळाची विचारपूस करण्यात आली तसेच पालकांची माहिती घेण्यात आली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळाच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर करत, धनादेशही सुपुर्द केला. बाळाच्या पालकांची सर्व कागदपत्रे कार्यालयाला देण्यात येणार आहेत’.