अरिहंत बिल्डर्सला ५ लाखांचा दंड
By admin | Published: April 22, 2015 11:50 PM2015-04-22T23:50:16+5:302015-04-22T23:50:16+5:30
करारानुसार कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या तसेच सोयीसुविधा न पुरविणाऱ्या अरिहंत बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने ५ लाखाचा दंड सुनावला आहे.
ठाणे : करारानुसार कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या तसेच सोयीसुविधा न पुरविणाऱ्या अरिहंत बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने ५ लाखाचा दंड सुनावला आहे.
रजनिकांत शाह आणि अशोक गाला यांनी नौपाडा येथे इमारत विकसित करून त्यातील सदनिकांची विक्री केली. मात्र त्यांनी करारात नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केली नाही. तसेच सदनिकाधारकांना सोयी-सुविधाही दिल्या नाहीत. त्यामुळे अरिहंत टॉवर गृहनिर्माण सहकारी संस्थेने विकासक शाह आणि गाला यांच्याबरोबर जमीन मालक भरत एडके यांच्याविरूद्ध मंचाकडे तक्रार दाखल केली.
कागदपत्र, घटना यांची पडताळणी केली असता फेब्रुवारी १९९२ च्या विक्री करारानुसार त्यामध्ये कायदेशीर बाबींची पूर्तता करू असे नमूद केले आहे. मात्र त्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन न केल्याने सदनिकाधारकांनी मिळून ३ मार्च १९९९ ला संस्था स्थापन केली. त्यानंतरही बिल्डर्सने इमारतीसह भूखंडाचे हस्तांतरण केले नाही. लिफ्टसंदर्भातील पीडब्ल्यूडीचे प्रमाणपत्र दिले नाही, अग्निप्रतिबंधक उपाययोजना केली नाही, नळाची जोडणी, पाण्याचे फिल्टरेशन करण्याची सोय केली नाही, त्यामुळे सदनिकाधारकांची गैरसोय झाली आणि संस्थेला यासाठी खर्च करावा लागला, असे मंचाने स्पष्ट केले. या प्रकरणी विकासकांनी संस्थेला नुकसानभरपाई म्हणून ५ लाख, तक्रार खर्च १० हजार आणि भोगवटा प्रमाणपत्र ४५ दिवसात द्यावे,तसेच विकासक आणि जमिन मालक यांनी इमारतीच्या भूखंडाचे हस्तांतरण पत्र संस्थेच्या हक्कात करावे, असे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)०