टाटा पॉवरला ५ लाखांचा दंड; युनिट सुरू करण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 07:01 AM2019-04-12T07:01:27+5:302019-04-12T07:01:30+5:30
मुंबईच्या उपनगरात टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जात असून, ट्रॉम्बे येथे टाटा पॉवरचे थर्मल पॉवर स्टेशन आहे.
मुंबई : ट्रॉम्बे येथील थर्मल पॉवर स्टेशनमधील युनिट आठ निर्देश दिल्यानंतरही कार्यान्वित केले नसल्याच्या कारणात्सव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने टाटा पॉवरला गुरुवारी तब्बल पाच लाख रुपयांचा दंड ठोठाविला आहे.
मुंबईच्या उपनगरात टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जात असून, ट्रॉम्बे येथे टाटा पॉवरचे थर्मल पॉवर स्टेशन आहे. येथील बंद असलेले युनिट आठ सुरू करण्यासंबंधी आयोगाने टाटा पॉवरला यापूर्वीही निर्देश दिले होते. महत्त्वाचे म्हणजे बंद असलेले युनिट किमान ७५ टक्के सुरू करण्यात यावे, असेही आयोगाने म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र आयोगाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजवणी करण्यात टाटा पॉवरला यश आले नाही.
परिणामी, आयोगाने या प्रकरणी त्यांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठविला. दरम्यान, येथील बंद असलेले युनिट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती टाटा पॉवरने आयोगाला दिली होती. मात्र युनिट सुरू होण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही आणि अंमलबजावणी टाटाकडून झाली नाही. त्यामुळे टाटा पॉवरला पाच लाखांचा दंड ठोठाविण्यात आला.
दरम्यान, टाटा पॉवरच्या प्रवक्ताने याबाबत सांगितले की, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने याप्रकरणी जे निर्देश दिले आहेत; त्याचा आम्ही अभ्यास करू. आमची सेवा अधिक जलद आणि ग्राहकभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
सुनावणी २५ एप्रिलला
टाटा पॉवरकडून उपनगरातील वीजपुरवठा केला जात असतानाच बेस्टलाही टाटाकडून विजेचा पुरवठा केला जातो. मुंबईला होत असलेल्या वीजपुरवठ्यात ऐनवेळी समस्या निर्माण झाल्यास अडचणी येऊ शकतात. त्यादृष्टीने वीजनिर्मिती करणारे युनिट कार्यान्वित करणे महत्त्वाचे असून, या प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.