Join us

५ लाखांचे ५५ लाख, टायपिंग करताना चूक; मलिकांबाबत ईडीची न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 5:54 AM

नवाब मलिक यांनी दाऊदकडून ५५ लाख रुपयांना मालमत्ता खरेदी केली, असे पहिल्या रिमांडमध्ये लिहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  मलिक यांनी दाऊदकडून ५५ लाख रुपयांना मालमत्ता खरेदी केली, असे पहिल्या रिमांडमध्ये लिहिले आहे. मात्र, टायपिंग करताना चूक झाली, असे ईडीतर्फे सिंग यांनी न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर नवाब मलिक यांचे वकील   अमित देसाई यांनी आक्षेप घेतला. ‘तुम्ही पहिले रिमांड याच रकमेवर घेतले आहे. सारासार विचार करून अटक करा,’ असे देसाई यांनी म्हटले. दहशतवादी कारवायांसाठी दिलेले पाच लाख असू दे किंवा १ रुपया, त्याचा तपास केला पाहिजे, असे सिंग म्हणाले.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत विशेष पीएमएलए न्यायालयाने ७ मार्चपर्यंत वाढ केली. मलिक यांना अटक केल्यानंतर रुग्णालयात नेल्याने ते चौकशीसाठी उपलब्ध नव्हते. विशेष पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी मलिक यांच्या ईडी कोठडीत वाढ केली.

मलिक यांनी सीआरपीसी कलम १६७ (२) अंतर्गत रिमांडला विरोध करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. मलिक यांना ८ दिवस ईडी कोठडी ठोठावण्यात आली. आरोपीला काही वैद्यकीय तक्रारी असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. ३-४ दिवस त्यातच गेले. वैद्यकीय तक्रारींकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात केला.

टॅग्स :नवाब मलिकअंमलबजावणी संचालनालय