Join us

मुंबईतल्या ५ बिबट्यांना लागणार कॉलर; २ बिबट्यांना लागल्या कॉलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:06 AM

बिबटे आणि माणसे यांच्यामधील संबंध चांगल्या पद्धतीने अभ्यासता येणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय ...

बिबटे आणि माणसे यांच्यामधील संबंध चांगल्या पद्धतीने अभ्यासता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वतीने मुंबईतल्या बिबट्यांचा टेमीमेट्रीद्वारे अभ्यास सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प दोन वर्षांचा असून, या अंतर्गत एकूण पाच बिबट्यांना कॉलर लावली जाणार आहे. यातील पहिल्या दोन बिबट्यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये कॉलर लावण्यात आल्या. पुढील तिघांना वर्षाच्या शेवटी कॉलर लावल्या जातील. एकूण तीन मादी आणि दोन नर बिबट्यांना कॉलर लावण्यात येतील.

रेडिओ कॉलरिंग हे बिबट्याचा अभ्यास करण्यासाठीचे एक साधन आहे. यात त्या प्राण्याला एक जीपीएस ट्रान्समीटरयुक्त कॉलर लावली जाते. त्यामुळे त्या प्राण्याच्या हालचाली समजून घेता येतात. या कॉलरची बॅटरी जितकी दिवस चालते तितके दिवस ही कॉलर काम करते. कॉलरची बॅटरी जवळपास ६ हजार स्थानांची नोंद घेते.

रेडिओ टेलीमेट्री आपणास बिबटे कुठे आणि कसे वावरतात, ते रस्त्यांसारखे अडथळे कसे पार करतात, कोणते भाग वापरतात आणि माणसांशी त्यांच्या परस्पर क्रिया कशा प्रकारे होतात हे समजून घेण्यास मदत करते. याचा उपयोग करून शहरी भागातील बिबट्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकते.

कॉलर लावण्यासाठी बिबट्याला एका पिंजऱ्यात पकडले जाते. त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन शांत केले जाते. मग त्याच्या गळ्याभोवती कॉलर लावली जाते. यानंतर त्याच्या शरीराचे तापमान मोजून त्याला पुन्हा पिंजऱ्यात ठेवले जाते. साधारणपणे ५ ते ६ तासांनी औषधाचा प्रभाव उतरल्यावर त्याला सोडून दिले जाते.

या कॉलरमध्ये एक जीपीएस ट्रान्समीटर असते. जे विशिष्ट वेळी तो प्राणी नेमका कुठे आहे याची माहिती पुरवतो. त्या प्राण्याच्या स्थानाविषयी ही माहिती सीम किंवा सॅटेलाईटद्वारे सर्व्हरवर पाठविली जाते. मात्र ती ताबडतोब उपलब्ध होत नाही. तर अनेक विलंबाने ती मिळते. असे त्या प्राण्याला लावलेल्या रेडिओ कॉलरची बॅटरी वाचविण्यासाठी केले जाते. शिवाय जेव्हा तो प्राणी एखाद्या गुहेत असतो तेव्हा ही माहिती मिळणे पूर्णपणे थांबू शकते किंवा यास विलंब होऊ शकतो. कॉलरमध्ये ड्रॉप ऑफ तंत्र आहे. ज्यामुळे ती प्राण्याच्या शरीरापासून दुरूनच वेगळी केली जाऊ शकते.