जलयुक्त शिवारसाठी ५0 लाख
By admin | Published: May 3, 2015 10:57 PM2015-05-03T22:57:17+5:302015-05-03T22:57:17+5:30
टाटा कंपनीच्या धरणातील पाणी कालव्यामधून ज्या परिसराला दुबार शेतीसाठी दिले जाते, त्या राजनाला कालवा भागातील मांडवणे गावाचे शिवार अनेक वर्षे
नेरळ : टाटा कंपनीच्या धरणातील पाणी कालव्यामधून ज्या परिसराला दुबार शेतीसाठी दिले जाते, त्या राजनाला कालवा भागातील मांडवणे गावाचे शिवार अनेक वर्षे पाण्याच्या दृष्टीने टंचाईग्रस्त आहे. मांडवणे गावाच्या शिवारात पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत सुरू आहे. तेथे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि जुन्या जलसंरचना यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामधून दहा मातीचे नाला बांध, तीन माती नाला बांध दुरु स्ती आणि तीन सलग समतल चर यांची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी यावर्षी तब्बल ५० लाख निधी शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मांडवणे ग्रामपंचायत हद्दीचा पेज नदीकडील भागात तर जमिनीला भेगा पडलेल्या दिसून येतात. आदिवासी वाडी परिसर हा नदीच्या वरच्या भागात आहे, तेथून एक किलोमीटर अंतरावर जमिनीमध्ये भरपूर पाणी असताना मात्र काही भागात अजिबात पाणी नाही. अशी भिन्न परिस्थिती मांडवणे ग्रामपंचायतमधील काही भागात आहे. तेथे जमिनीची भूजल क्षमता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान फायदेशीर ठरणार आहे.त्याच भागात मोठ्या प्रमाणात मातीचे बंधारे बांधले जात असल्याने अभियान यशस्वी झाल्यास या परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होऊ शकते. त्यासाठी कृषी आणि लघु पाटबंधारे विभागाला स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांची साथ मिळणे आवश्यक आहे.त्यासाठी शासनाच्या विविध योजना प्राधान्याने राबविणारे गाव म्हणून मांडवणे ग्रामपंचायतीचा लौकिक आहे. त्यामुळे आम्ही हे अभियान सर्व ग्रामस्थ मिळून यशस्वी करू असा विश्वास सरपंचांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)