सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:23 AM2019-09-20T06:23:12+5:302019-09-20T06:23:15+5:30
राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीच्या कोंडीला प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी २१४४ पदे भरण्यात येणार आहेत.
- जमीर काझी
मुंबई : राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीच्या कोंडीला प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी २१४४ पदे भरण्यात येणार आहेत. तीन अधीक्षक, ६ उपअधीक्षकांसह २७ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. नव्या पदाच्या निर्मितीसाठी पोलीस महासंचालकांनी पाठविलेल्या प्रस्तावाला गृह विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे.
उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनांनुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आवश्यकतेनुसार आणखी जागांची निर्मिती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
वाहतूककोंडीच्या समस्येवर ठोस कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका २०१३ मध्ये दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयाने राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पदाची निर्मिती करण्याची सूचना होती. त्यांच्याकडून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे सोडून दिलेली, बेवारस वाहने हटविणे, ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संंबंधित अधिकारी, अंमलदारांनी विविध उपाययोजना राबवायच्या आहेत.
न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतूक शाखांकरिता एकूण विविध दर्जाची २१४४ पदे दव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव या वर्षी २३ जानेवारीला गृह विभागाला सादर केला होता. त्याबाबत पुन्हा दोन वेळा स्मरणपत्रे पाठविण्यात आली होती. त्यानंतर वित्त विभागाने नवीन पदाच्या निर्मितीसाठी येणाºया खर्चाला
मंजुरी दिली. त्याबाबत ८ जुलैला उच्चस्तर सचिव समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात
आली होती. त्यानुसार राज्यातील विविध पोलीस घटकांत
वाहतूक शाखांकरिता पहिल्या टप्प्यात नव्याने पदे निर्माण केली जाणार आहेत.
नव्याने निर्माण होणारी संवर्गनिहाय पदे
पद संख्या
अधीक्षक ३
उपअधीक्षक ६
निरीक्षक २७
साहाय्यक निरीक्षक ६३
उपनिरीक्षक १०८
पद संख्या
साहाय्यक फौजदार १२६
हवालदार ३७९
शिपाई ११४३
चालक शिपाई २८९