तेजस ठाकरेंनी शोधल्या पालींच्या पाच नव्या प्रजाती; संशोधनात ईशान आगरवाल, अक्षय खांडेकरही सहभागी
By सचिन लुंगसे | Published: December 7, 2022 09:58 PM2022-12-07T21:58:47+5:302022-12-07T21:59:30+5:30
व्हर्टिब्रेट्स झूलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमधून हा शोध निबंध प्रसिद्ध झाला.
मुंबई : महाराष्ट्रातील तरुण संशोधकांना तमिळनाडूमधील जिल्ह्यातून पालीच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात यश आले आहे. निमास्पिस कुळातील या प्रजाती आहेत. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून गेकोस ऑफ पेनिन्सुला इंडिया हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. संस्थेतील संशोधकांनी निमास्पिस कुळातील पाच पालींचा शोध लावला. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे ईशान आगरवाल, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांनी संशोधन केले आहे.
निमास्पिस सलिमअली या प्रजातीचे नामकरण डॉ. सलीम अली यांच्या नावावरुन केले आहे. डॉ. सलीम अली यांनी भारतातील पक्षी संशोधनामधे केलेल्या अतुलनीय कार्यासाठी या प्रजातीचे नामकरण त्यांच्या नावे केले आहे. ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या ११०० मीटरच्या वरती आढळते. निमास्पीस रुधीरा येरकाड पर्वतावरती आढळते. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगावरुन तिचे नामकरण रुधीरा (रक्त) असे केले आहे. निमास्पिस आगाईगंगा ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या पूर्वेकडील उताराच्या मध्यउंचीवर आढळून येते. आगाईगंगा धबधब्याजवळ प्रथम आढळून आली म्हणून तिचे नामकरण निमास्पिस आगाईगंगा असे केले आहे.
निमास्पिस फंटास्टिका ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या पश्चिम उताराच्या मध्यउंचीवर आढळून येते. वैशिष्ट्यपूर्ण रंगयोजनेवरुन तिचे नामकरण फंटास्टिका या ग्रिक शब्दाने केले आहे. निमास्पिस पचमलाएनसीस या प्रजातीचे नामकरण पचमलाई या पर्वतावरुन केले आहे. या प्रजाती ३० ते ३५ मिमी लांबीच्या आहेत. नराचे रंग भडक असतात तर माद्या या रंगाने फिकट असतात. या पाली मुख्यत्वे दगडांवरती आढळतात आणि दिवसा सक्रीय असतात. छोटे किडे आणि मुंग्या हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
या पाचही प्रजाती कमी भागात पसरलेल्या प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत. विशिष्ट उंची आणि विशिष्ट डोंगरउतार सोडून त्या इतरत्र आढळत नाहीत. येरकाड, कोल्ली आणि सिरुमलाई हे पर्वंत शेव्हरॉय या पर्वंतरांगेचे भाग आहेत. शेव्हरॉय पर्वतरांग ही पश्चिम घाटापासून तुटलेली स्वतंत्र पर्वतरांग आहे. पश्चिम घाटापेक्षा तुलनेनं कमी पावसाच्या, कोरड्या भागातून अनेक नव्या प्रजातींचा शोध गेल्या दशकभरात लागला आहे. त्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने या भागाचे महत्त्व वाढत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"