मुंबई : भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रथमच महाराष्ट्रात ५ ऑलिव्ह रिडले कासवांवर यशस्वीपणे उपग्रहीय (सॅटेलाईट) टॅग लावण्यात आले. ऑलिव्ह रिडले कासवांवर उपग्रहीय (सॅटेलाईट) टॅग लावण्याचा पश्चिम किनाऱ्यावरचा पहिलाच प्रयोग आहे.
ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विखुरलेली आढळतात. आजतागायत ऑलिव्ह रिडले कासवांचे टॅगिंग फक्त भारताच्या पूर्वी किनाऱ्यावरच होत आले आहे. या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांचे पश्चिम किनाऱ्याजवळील पाण्यातील मार्गांतरण कळण्यास मदत होईल.
२५ जानेवारी रोजी प्रथमा हे पहिले कासव वेळास येथे आणि सावनी हे दुसरे कासव आंजर्ले येथे टॅग केले. या टॅग्सद्वारे कासवांच्या स्थलांतरणाची नियमित माहिती मिळत आहे. उर्वरित ३ कासवे रत्नागिरीतील गुहागर येथे टॅग करण्यात आली. वनश्री या कासवाला १५ फेब्रुवारी तर रेवा आणि लक्ष्मी या कासवांना १६ फेब्रुवारी रोजी टॅग लावण्यात आले. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ५ कासव माद्यांचे उपग्रहीय (सॅटेलाईट) टॅगिंग पूर्ण झाले.